बेळगाव लाईव्ह:स्वयंविकास शिबिरांतर्गत संस्कृती एज्युकेअरच्या विद्यार्थी -विद्यार्थिनींनी सहलीद्वारे नुकतीच शांताई वृद्धाश्रमाला भेट दिली आणि तेथील ज्येष्ठ नागरिक आजी -आजोबांच्या सहवासाचा एक वेगळाच मौल्यवान असा अविस्मरणीय अनुभव घेतला.
स्वयंविकास शिबिरांतर्गत शांताई वृद्धाश्रमला भेट देणाऱ्या संस्कृती एज्युकेअरच्या पथकामध्ये स्वतः संस्थेचे प्रमुख तेजस कोळेकर यांच्यासह एकूण 25 सदस्यांचा समावेश होता.
सदर भेटी प्रसंगी शांताई वृद्धाश्रमाचे कार्याध्यक्ष माजी महापौर विजय मोरे यांनी विद्यार्थ्यांना वृद्धाश्रमाचा दौरा घडविला. यावेळी त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या सर्व सुविधा आणि यंत्रणा कशी कार्य करते याची मोठ्या आत्मीयतेने माहिती दिली दिली. सध्याच्या कौटुंबिक परिस्थितीबद्दल संस्कृती एज्युकेअरचे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्याशी अनेक हृदयद्रावक कथा शेअर केल्या.
तसेच संस्कृती एज्युकेअरचे विद्यार्थी आणि पालक वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना मदत करतील किंबहुना त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे आपले आजी -आजोबा अशा वृद्धाश्रमात येणार नाहीत याची दक्षता घेतील, अशी अपेक्षा मोरे यांनी व्यक्त केली.
यावेळी विद्यार्थ्यांनी आश्रमातील आजी -आजोबांशी संवाद साधण्याबरोबरच शिबिरातील आपले अनुभव कथन केले.
संस्कृती एज्युकेअरचे संस्थापक व सीईओ तेजस कोळेकर यांनी शांताई वृद्धाश्रमातील वडिलधाऱ्यांबद्दल आपले मत व्यक्त करून त्यांचे आशीर्वाद घेतले. अखेर विजय मोरे याच्यासह सर्वांनी ‘ओम’ जपाच्या छोट्या ध्यानात भाग घेतला आणि त्यानंतर आश्रमातील आनंदी क्षणांचे चित्रण केले. एका पालकाने आपल्या वडिलांसाठी पाठविलेला एक सुंदर केक यावेळी आश्रमातील आजींच्या हस्ते वाढदिवसाचे गाणे गाऊन कापण्यात आला. शेवटी, परतीच्या वाटेवर निघण्यापूर्वी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षकांनी शांताई वृद्धाश्रमातील आजी -आजोबांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले.
शांताई वृद्धाश्रमाला दिलेल्या भेटीच्या अनुषंगाने बोलताना तेजस कोळेकर म्हणाले की, आज आपण अनेक गोष्टी साध्य करण्याचे काम करतो आणि स्वप्ने पाहतो, परंतु या प्रक्रियेत कौटुंबिक नात्याचे नियोजन करण्यात अपयशी ठरतो. ते कोणत्या दुःखात आहेत याची आपल्याला जाणीवही नसते. खरंतर कुटुंबाला प्राधान्य असले पाहिजे आणि कोणत्याही गोष्टीपेक्षा नेहमीच कुटुंबाला प्रथम निवडले पाहिजे. जगात असे एकही ठिकाण नाही जिथे जावून तुम्हाला तुमच्या घरासारखे व्यक्त होता येते किंवा तसा अनुभव घेता येतो. ज्यांना घराबाहेर टाकले आहे किंवा ज्यांचे घर नाही त्यांना हे दुःख समजू शकते, पण आपण आपल्याच आई-वडिलांना वृद्धाश्रमात का टाकतोय? ते पूर्णपणे चुकीचे आहे, कारण आई-वडील ही माणसे घरात असलीच पाहिजेत.
पालक आणि समाज यांच्याकडून मिळालेल्या सकारात्मक भावना व आशीर्वादांमुळे कुटुंब समृद्ध होते आणि त्याचप्रमाणे पालक आणि समाज यांच्या नकारात्मक भावना आणि शापांमुळे कुटुंब उध्वस्तही होऊ शकते. आई-वडिलांना वृद्धाश्रमात टाकून आपण आपल्या जीवनाचा आनंद लुटतो तेंव्हा आपण अधोगतीला बोलावतोय हे नक्की. मनोवैज्ञानिक समस्या वाढत आहेत. कारण आपण कौटुंबिक व्यवस्था तोडून न्यूक्लियर झोनकडे जात आहोत असे सांगून वडिलधाऱ्यांमुळेच आपल्याला पुढे जाण्यासाठी कल्पना आणि धैर्य मिळते. परंतु खेदाची गोष्ट आहे की कांही लोक हे करत नाहीत. संस्कृती एज्युकेअरमध्ये आम्ही मुलांना नेहमी त्यांच्या पालकांचा आदर करण्यास आणि त्यांची काळजी घेण्यास शिकवतो आणि त्या बदल्यात पालकांना देखील त्यांच्याद्वारे आयोजित विविध पालक सत्रांमध्ये सध्याच्या पिढीशी नाते कसे टिकवायचे ते सांगतो, अशी माहिती तेजस कोळेकर यांनी दिली.