बेळगाव लाईव्ह: भारतीय सैन्य दलात भर्ती होणे ही युवकासाठी अभिमानाची बाब असते. एक तर रोजगार आणि दुसरी देशसेवा हे दोन्ही उद्देश साध्य होते त्यामुळे भारतीय सैन्य दलात दाखल होण्यासाठी युवकांची रस्सीखेच लागलेली असते.
सैन्य दलात भरती होण्यासाठी प्रशिक्षण देणाऱ्या संस्था बेळगाव भरपूर आहेत मात्र अलीकडच्या काळात बेळगाव क्लब रोड येथील एस जी आर्मी कोचिंग सेंटर या संस्थेने अनेक युवक विद्यार्थ्यांना भारतीय सैन्य दलात दाखल होण्यासाठी यशस्वीरित्या मार्गदर्शन केले आहे. कणबर्गी येथील प्रशांत शहापूरकर यांच्या माध्यमातून या संस्थेतील अनेक युवक युतीने भारतीय सैन्य दलात प्रवेश मिळवला आहे.
बेळगाव शहरातील एसजी आर्मी कोचिंग सेंटर बेळगाव या संस्थेतर्फे आयोजित भारतीय सैन्य आणि आयटीबीपीमध्ये निवड झालेल्या संस्थेच्या 30हून अधिक विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच उत्साहात पार पडला.
क्लब रोड येथील संस्थेच्या सभागृहात आयोजित या सत्कार समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून ओमप्रकाश नाईक, रेखा पाटील, सौम्या होशहळ्ळी व श्वेता पाटील हे उपस्थित होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक झाल्यानंतर प्रमुख पाहुणे ओमप्रकाश नाईक यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने समारंभाचे उद्घाटन झाले. आपल्या उद्घाटनपर भाषणात नाईक म्हणाले की, मुलांनी कमी वयातच शालेय स्तरावर असल्यापासून स्पर्धात्मक परीक्षांची तयारी सुरू केल्यास ते निश्चितपणे आपले ध्येय गाठू शकतात परीक्षा जवळ आली की मुले तयारीला लागतात हे चुकीचे असून त्यामुळे निवड होण्यास वेळ लागतो. मात्र ज्या मुलांनी शाळेत सातवी आठवीपासूनच स्पर्धात्मक परीक्षेची तयारी सुरू केलेली असते तशा मुलांना लष्कराच्या पहिल्याच भरतीत शारीरिक असो अथवा लेखी परीक्षा असो त्यात यश मिळवणे सोपे जाते.
महत्त्वाचे म्हणजे मुलांनी गणित व विज्ञान विषय चांगले आत्मसात करावे आणि या विषयांसाठी ठराविक वेळ निश्चित करून चांगला सराव करावा. त्याचप्रमाणे लष्कर, पोलीस वगैरे खात्यांमध्ये भरती होण्यासाठी मुलांनी योग्य मार्गदर्शन घेतले पाहिजे. पूर्वी कोचिंग सेंटर अर्थात प्रशिक्षण केंद्र नसायची त्यामुळे नेमकं काय करायचं हे मुलांना कळत नव्हतं मात्र अलीकडच्या काळात एसजी आर्मी कोचिंग सेंटर सारखी मान्यता प्राप्त प्रशिक्षण केंद्र स्थापन झाली आहेत जी यांकडून लष्करी भरतीसाठी आवश्यक मार्गदर्शन आणि तयारी करून घेतात .
या केंद्रांचा लाभ मुलांनी घेतला पाहिजे सदर केंद्रांमध्ये आपल्या मुलाला दाखल करायचे नसले तरी पालकांनी त्यांना सोबत घेऊन नेमके कसे प्रशिक्षण दिले जाते हे जाणून घेण्यासाठी अशा केंद्रांना भेट दिली पाहिजे असे सांगून ओम प्रकाश नाईक यांनी मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. प्रमुख पाहुण्या रेखा पाटील यांनी देखील उत्तम मार्गदर्शन केले.
यावेळी लष्करात निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी मनोगत -अनुभव कथन केले. समारंभास प्रशांत शहापूरकर यांच्या एसजी आर्मी कोचिंग सेंटर मधून प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभलेले सुमारे 100 विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कार शहापूरकर व अदिती पाटील यांनी केले. शेवटी अर्णव जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.