बेळगाव लाईव्ह :टिळकवाडी येथील आरपीडी कॉलेज रोड, अजिंठा कॅफे समोरील रस्त्याच्या दुभाजकावर लावलेल्या झाडांच्या बहरलेल्या फांद्या बेकायदा तोडण्यात आल्या असून महापालिका व वनखात्याने याकडे लक्ष देऊन तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
आरपीडी कॉलेज रोड, अजिंठा कॅफे समोरील त्याच्या दुभाजकावर लावलेली झाडे आजूबाजूच्या दुकानदारांना, रस्त्याने जाणाऱ्यांना आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांनाही चांगली सावली आणि ताजी हवा देत होती.
सध्या बेळगावचे तापमान खूप वाढले असून उन्हामुळे रस्त्यावर फिरणे कठीण झाले आहे. सिमेंट काँक्रीटचे रस्ते आणि तोडण्यात येत असलेली रस्त्यावरील झाडे हे याचे मुख्य कारण आहे. अजिंठा कॅफे समोरील झाडांच्या फांद्या तोडून ती बोडकी करण्यात आल्यामुळे आता आजूबाजूचे लोक पश्चाताप करत आहेत.
पहाटेच्या वेळी कोणा अज्ञातानीं ही झाडे तोडल्याची चर्चा आहे. तेंव्हा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी गांभीर्याने लक्ष द्यावे. तसेच पहाटेच्या वेळी पाळत ठेवून सदर गैरप्रकार करणाऱ्यांना पकडून कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
दरम्यान वृक्षतोडीची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते व वृक्षप्रेमी ॲड. दीपक अवर्सेकर यांनी आज तात्काळ आरपीडी कॉलेज रोड रस्त्याच्या ठिकाणी भेट देऊन वृक्षतोडीच्या बाबतीत तेथील दुकानदारांना जागृत केले. तसेच दुकान उघडण्याच्या काळात कोणी झाडे तोडताना दिसले तर मला त्वरित कळवा अशी सूचना त्यांना केली.
याखेरीस अवर्सेकर यांनी तोडण्यात आलेल्या झाडांबद्दल महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली. मात्र त्यांनी आपण ती झाडे तोडली नसल्याचे सांगितले. त्यामुळे सदर झाडे बेकायदेशीर रित्या तोडण्यात आल्याचे स्पष्ट होत असून टिळकवाडी परिसरात अलीकडे सातत्याने बेकायदा वृक्षतोडीचे प्रकार घडत आहेत.
महिन्या दीड महिन्यापूर्वी आगरकर रोड टिळकवाडी येथील गावडे नामक व्यक्तीच्या घराशेजारी रस्त्याकडेला असलेले दोन मोठे वृक्ष वनखात्याची परवानगी असल्याची बतावणी करून जमीनदोस्त करण्यात आले. त्यामुळे सदर प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन महापालिका व वनखात्याने एखादा वृक्षतोड करणाऱ्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी पर्यावरण प्रेमींमध्ये केली जात आहे.
यासंदर्भात बोलताना ॲड. दीपक अवर्सेकर यांनी बेळगावचे वातावरण हरित आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी प्रत्येकाने बेकायदेशीर वृक्षतोडीला आळा घालण्यास पुढाकार घ्यावा आणि सध्या वाढत असलेल्या झाडांचे संवर्धन करावे. असे आवाहन केले आहे.