बेळगाव लाईव्ह :महिला स्वाभीमानाच्या गोष्टी करणाऱ्या भाजपने रेवण्णा यांच्या व्हीडीओ वर आपली भूमिका स्पष्ट करावी असा सवाल महिला बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केला आहे.
कर्नाटकातील हासन येथे भापज-निजद आघाडीचे उमेदवार खासदार प्रज्वल रेवण्णा यांचे शेकडो महिलांसोबतचे व्हीडीओ व्हायरल झाले आहेत. या प्रकरणात महिलांचा लैंगिक छळ झाला असून भाजपने यावर अद्याप भुमिका स्पष्ट केली नाही, असा सवाल महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सोमवारी उपस्थित केला.
मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या, रेवण्णा यांच्या या प्रतापाबाबत तेथील भाजप नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांना सांगितले होते. तरी भाजपने प्रज्वल यांना उमेदवारी दिली. निजदसोबत आघाडी केली. आता प्रज्वल यांचे प्रताप उघडकीस आले आहेत. त्यांनी शेकडो महिलांवर लैंगिक अत्याचार केला आहे.
त्याबाबत राज्य सरकारने गांभीर्याने चौकशी सुरू केली आहे. पण, महिलांच्या स्वाभीमानाबाबत बोलणार्या भाजपने या विषयावर अद्याप आपली भुमिका स्पष्ट केली नाही. राजकीय लाभासाठी निजदसोबत आघाडी करणार्या भाजपला आपली भुमिका स्पष्ट करण्याची नैतिकता दाखवावी.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सभेत बेळगाव आणि हुबळी येथे घडलेल्या घटनांचा उल्लेख केला. आम्हीही या घटनांचा निषेध केला आहे. उमेदवार जगदिश शेट्टर आणि इतर लोकांनी आंदोलन केले. पण, आता शेकडो महिलांवर झालेल्या अत्याचाराबाबत ते का गप्प आहेत, हे जाहीर करावे, असे आव्हानही हेब्बाळकर यांनी दिले.
यावेळी उच्च शिक्षण मंत्री डी. सुधाकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी उपस्थित होते.