बेळगाव लाईव्ह : शुक्रवारी दुपारी बेळगावमधील विविध भागात वळिवाने हजेरी लावली. सकाळपासूनच ढगाळ वातावरण अनुभवणाऱ्या बेळगावकरांना दुपारनंतर पडलेल्या पावसामुळे उष्णतेपासून दिलासा मिळाला. शहर, ग्रामीण, दक्षिण यासह तालुक्यातील विविध गावांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या.
गेल्या आठवड्याभरात वळिवाच्या पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली होती. मात्र तरीही उष्म्यामध्ये वाढ झाली होती. शुक्रवारी सकाळपासूनच अधिक उष्मा जाणवत होता. त्यानंतर दुपारी वळीव पावसाचे आगमन झाले. शहरासह उपनगरामध्ये काहीवेळ पाऊस पडला. मात्र उष्मा कायम राहिला होता. या पावसामुळे ये-जा करणाऱ्या पादचारी, वाहनचालकांना काहीसा त्रास सहन करावा लागला.
शहराबरोबर ग्रामीण भागामध्येही पावसाच्या सरी कोसळल्या. वळिवाचा पाऊस नसल्याने शेतीकामे खोळंबली होती मात्र वळिवाच्या पावसाने शेतकरी सुखावला असून पेरणीपूर्व मशागतीच्या कामासाठी आजचा पाऊस फायदेशीर ठरणार आहे. दुपारी ३ च्या दरम्यान वारा आणि ढगांचा गडगडाट करत पावसाचे आगमन झाले.
सुऊवातीला पावसाचा शिडकावा झाला. मात्र त्यानंतर काही वेळाने पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. वास्तविक जोरदार पाऊस झाल्यानंतर हवेत गारवा निर्माण होणे गरजेचे होते. उलट पावसामुळे आणखीनच उष्म्यामध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. या पावसामुळे फेरीवाले, भाजीविक्रेते आणि इतर रस्त्यावरील बैठ्या व्यापाऱ्यांना त्याचा त्रास झाला.
सध्या यात्रा, जत्रा, लग्नसराईचा हंगाम सुरु असून याकरिता बाजारपेठेत गर्दी होती. मात्र दुपारनंतर आलेल्या पावसामुळे खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची एकच तारांबळ उडाली. मात्र पाऊस ओसरल्यानंतर पुन्हा बाजारात नेहमीप्रमाणे गर्दी वाढू लागली.काहीवेळानंतर पावसाने विश्रांती घेतली.