बेळगाव लाईव्ह :राज्यात गेल्या 1 ते 22 मार्च 2024 या कालावधीत घेण्यात आलेल्या पदवी पूर्व (पियूसी) द्वितीय वर्षाच्या परीक्षेचा निकाल आज बुधवारी जाहीर झाला आहे. बेंगलोर येथे शिक्षण खात्याने पत्रकार परिषद घेऊन तशी घोषणा केली असून यंदाच्या परीक्षेत शेकडा 81.15 टक्के विद्यार्थी -विद्यार्थिनी उत्तीर्ण झाले आहेत.
यंदाच्या पदवी पूर्व द्वितीय वर्षाच्या परीक्षेत बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 55 लाख 2 हजार 590 विद्यार्थी -विद्यार्थिनी उत्तीर्ण होऊन पुढील वर्गात गेले आहेत.
वेबसाईटवर परीक्षेचा अधिकृत निकाल आज सकाळी 11 वाजता जाहीर करण्यात आला आहे. पदवी पूर्व शिक्षण खात्याच्या karresults.nic.in आणि pue.kar.nic या अधिकृत वेबसाईटवर निकाल उपलब्ध असतील.
यंदाच्या या परीक्षेत कलाशाखेचे 1 लाख 28 हजार 448 विद्यार्थी, वाणिज्य शाखेचे 1 लाख 74 हजार 315 विद्यार्थी आणि विज्ञान शाखेचे 2 लाख 49 हजार 927 विद्यार्थी -विद्यार्थिनी उत्तीर्ण झाले आहेत.
त्याचप्रमाणे शेकडा 97 टक्क्यांसह दक्षिण कन्नड अर्थात मंगळूर जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून उडपी जिल्हा (96.80 टक्के) द्वितीय स्थानावर आहे, तर विजयपूर जिल्हा 94.89 टक्क्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
यंदा एकूण 3.3 लाख विद्यार्थी आणि 3.6 लाख विद्यार्थिनी पदवी पूर्व द्वितीय वर्षाच्या परीक्षेला बसले होते. या पद्धतीने राज्यातील 1124 परीक्षा केंद्रांवर घेतल्या गेलेल्या या परीक्षेत एकूण 6.98 लाख विद्यार्थी -विद्यार्थिनींनी हजेरी लावली होती.