बेळगाव लाईव्ह :बेळगाव महापालिकेच्या घरपट्टी अर्थात मालमत्ता कर भरून घेण्याच्या प्रक्रियेत सुरू असलेल्या सावळ्या गोंधळाबाबत माजी नगरसेवक संघटनेने आज गुरुवारी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. तसेच त्यांना घरपट्टीतील सवलतीची मुदत महिनाभर वाढवून देण्याबरोबरच भरणा प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी 7 मेपर्यंत मुदत देऊ केली.
नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी महापालिकेने घरपट्टीचे ऑनलाइन चलन उपलब्ध करून देणे आवश्यक होते, पण तसे झाले नाही. तांत्रिक समस्येमुळे ऑनलाइन चलन उपलब्ध होत नसल्याचे सांगण्यात येत आहे. तथापि गेल्या 18 दिवसांपासून ही समस्या सुटलेली नाही. त्यामुळे बेळगावातील मालमत्ताधारक त्रस्त झाले आहेत. महापालिकेच्या विभागीय महसूल कार्यालयामध्ये घरपट्टीचे चलन दिले जात असले तरी ते तयार करण्यास विलंब लागत असल्यामुळे नागरिकांना तेथे तासनतास उभे राहावे लागत आहे. जनतेचा हा त्रास लक्षात घेऊन माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवक संघटना बेळगावच्या शिष्टमंडळाने आज गुरुवारी महापालिका आयुक्त यांची भेट घेतली. सदर भेटी प्रसंगी सुंठकर यांनी आयुक्तांसमोर मालमत्ता कर भरण्यात येणाऱ्या अडचणी आणि त्यामुळे नागरिकांना सहन करावा लागणारा त्रास, मनस्ताप याची माहिती दिली. त्याचप्रमाणे सदर समस्येचे लवकरात लवकर निवारण करून सवलतीमध्ये घरपट्टी अर्थात मालमत्ता कर भरण्याची मुदत वाढवून द्यावी अशी विनंतीही केली.
मनपा आयुक्तांच्या भेटीनंतर महापालिका कार्यालयाच्या ठिकाणी बेळगाव लाईव्हशी बोलताना माजी महापौर शिवाजी सुंठकर म्हणाले की, दरवर्षीची घरपट्टी अर्थात मालमत्ता कर महापालिकेकडून मार्च -एप्रिल पूर्वी भरून घेतला जातो. आता अलीकडच्या काळात ऑनलाईन पद्धतीने हा कर भरून घेतला जात आहे. तसेच नागरिकांनी मालमत्ता कर लवकर भरावा यासाठी अमुक तारखेच्या आत कर भरल्यास ठराविक करामध्ये 3 ते 5 टक्क्यापर्यंत सूट देण्याची ऑफरही राबविली जात आहे.
मात्र नागरिक जेंव्हा चलन घेण्यासाठी जातात त्यावेळी त्यांना दोन -दोन, तीन -तीन तास रांगेत ताटकळत थांबावे लागते. विचारणा केल्यास सर्व्हर डाऊन झाला वगैरे तांत्रिक कारणे सांगून नागरिकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार करून त्यांना माघारी धाडले जाते. यामुळे वेळेचा अपव्यय होण्याबरोबरच नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. तेव्हा निवडणूक वगैरे इतर कोणतेही व्याप असले तरी यापूर्वी कित्येक वेळा ज्याप्रमाणे मालमत्ता करातील सवलतीच्या बाबतीत कालावधी वाढवून देण्यात आला होता, त्याप्रमाणे यावेळी देखील कर भरण्याची सवलत आणखी महिनाभर वाढवून द्यावी आणि त्या पद्धतीने चलन वितरण करावे, अशी विनंती आम्ही केली आहे. कारण गर्दी न होता, लोकांना त्रास न होता कर भरण्याची सोय करून देणे ही महापालिकेची जबाबदारी आहे रांगेत तासनतास उभे राहून देखील चलन मिळत नसेल तर त्यात जनतेची काय चूक आहे.
दुसरीकडे उद्या तुम्ही वेळेत कर भरला नाही म्हणून संपूर्ण कर वसूल करण्याचा प्रकार महापालिकेकडून होता कामा नये. तेंव्हा महिनाभर मुदत वाढवून द्यावी आणि त्याबाबतचा निर्णय येत्या 7 मेपर्यंत घ्यावा. त्यानंतर माजी नगरसेवक संघटना त्याबाबतीत पुन्हा एकदा मनपा आयुक्तांना भेटून कर भरणा प्रक्रियेत सुधारणा झाली आहे की नाही याची शहानिशा करेल. जर सुधारणा झालेली नसेल तर जनहितार्थ आम्ही आंदोलन छेडू, असे माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी स्पष्ट केले.
मालमत्ता कर भरणा अडचणीबाबत मनपाचे स्पष्टीकरण
तांत्रिक अडचणी दूर करून मनपा सॉफ्टवेअर पुन्हा सुरू
कर्नाटक सरकारच्या आदेशानुसार बेळगाव महानगरपालिकेतील उपनिबंधकांच्या बाजार दरानुसार सन 2024-25 साठी मालमत्ता कराची वसुली सुरू झाली आहे. तथापी तांत्रिक त्रुटींमुळे कांही मालमत्तांच्या कर चलानमध्ये फरक झाला आहे. मात्र याबाबत कॉर्पोरेशनच्या ट्विटर अकाउंटवर सेसमधील फरकाबाबत ट्विट केले असता संबंधित प्रकरणातील सर्व तांत्रिक अडचणी दूर करून हे सॉफ्टवेअर जनतेच्या हितासाठी पुन्हा सुरू करण्यात आले आहे, असे महापालिका उपायुक्ततांकडून एका पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांच्या विशेष कर्तव्य अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे.