शिष्य : गुरुजी, आज समितीच्या कार्यालयात हालचाल सुरु झालेली आहे.
गुरुजी : होय. समितीतील इच्छुक अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी करत आहेत.
शिष्य : मग गुरुजी भरपूर मोठ्या प्रमाणात आता अर्ज येतील.
गुरुजी : नाही, नाही… समितीच्या मूळ ध्येयधोरणालाच समितीच्या नेत्यांनी हरताळ फासला आहे. सामान्य माणसाला उमेदवारी करता यावी, सामान्य माणसाला नेतृत्व करता यावं, आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी मदत व्हावी, कदाचित फाटका माणूस असेल पण तो माणूस समितीसाठी महत्वाचा आहे, या ध्येयधोरणातून समितीची रचना करण्यात आली होती. मात्र आता समितीमध्ये ‘लाखो – कोटींची’ उड्डाणं घेणारे लोक येत आहेत. समितीनेच पहिल्यांदा डिपॉझिट ठेवा, देणगी द्या अशाच पद्धतीचा अट्टहास ठेवल्यामुळे कोण सामान्य माणूस तिथे येऊन आपला अर्ज देणार?
शिष्य : गुरुजी हेदेखील नेत्यांचे बरोबरच आहे ना…! सटर-फटर लोक तिथे अर्ज केले तर अर्जाची मांदियाळी होईल ना..
गुरुजी : मांदियाळी होणेच गरजेचे आहे. कारण हे आंदोलन आहे. हजारो लोक आंदोलनात सहभागी होतात. जे जगाच्या पाठीवर ६७ वर्षे चाललेलं मराठी भाषेचं आंदोलन आहे, अशा पद्धतीच्या आंदोलनात सामान्यातला सामान्य माणूस आपण प्रतिनिधित्व करण्याची उच्च बाळगतो हे सुदृढ लोकशाहीचे लक्षण आहे. आणि त्यालाच समिती नेते हरताळ फासत आहेत, असं माझं मत आहे.
शिष्य : पण गुरुजी काहीतरी शिस्त असावी लागते. त्याच शिस्तबद्धतेने सर्व कामे झाली पाहिजे.
गुरुजी : अरे शिस्तीची कल्पना तू काय सांगतोस? परवाच्या समितीच्या बैठकीत झालेला गदारोळ तू पाहिला नाहीस का? हाणामाऱ्या, शिवीगाळ, खिशातून काढलेले चिटोरे, ठरविलेले डाव अन खेळी… हे सर्व अशापद्धतीने ज्यावेळी होतं त्यावेळी तिथं कुठल्या शिस्तीची अपेक्षा करायची…?
शिष्य : गुरुजी, मग शिस्त कशाला म्हणायची?
गुरुजी : वत्सा, एखादी गोष्ट व्यवस्थित चालायची असेल, तर काही नियमावली असावी लागते. धाक असावा लागतो. आणि हि गोष्ट राबविणारी लोकं शहाणी असावी लागतात.
शिष्य : मग गुरुजी, समितीचे लोकं शहाणे नाहीत! असं म्हणायचं आहे का तुम्हाला?
गुरुजी : अजिबात नाही. सर्वजण शहाणे आहेत. पण त्यांनी शहाणपण काढून खुंटीला टांगून ठेवलंय असं माझं मत आहे.
शिष्य : असं का म्हणताय गुरुजी?
गुरुजी : कारण ते शहाणपण आताच्या युगात उपयोगी पडत नाही. नेतेमंडळींचे लक्ष आता वेगळ्याच गाठोड्यावर आहे! महाराष्ट्रातून येणारे गाठोडे, वेगळ्या पक्षातून येणारे गाठोडे…
शिष्य : गुरुजी, तुम्ही नेत्यांवर अशापद्धतीने आरोप करताय.. हे काही मला पटले नाही…
गुरुजी : वत्सा, आरोप केल्याशिवाय सत्य बाहेर पडत नाही..!!!! ज्यावेळी धूर दिसतो त्यावेळी खाली आग असते असं म्हणतात.. तसंच.. आरोपाच्या पाठीमागे सत्य कुठंतरी लपलेलं असतं…
शिष्य : गुरुजी, तुम्ही अंधारात गोळी चालवताय. हे काही मला पटत नाही.
गुरुजी : शिष्या, सत्याला कधीही प्रकाश दिसतोच…! जेव्हा यामागचे सत्य बाहेर येईल, तेव्हा तुझ्या याच नेत्यांना पळता भुई थोडी होणार आहे.
शिष्य : गुरुजी, जर हे सगळे नेते पळून गेले तर हा रथ चालवणार कोण?
गुरुजी : हा रथ चालविण्यासाठी नवी पिढी आहे. त्यातही काही सज्जन लोक आहेत.
शिष्य : नाही, नाही…! गुरुजी सज्जन म्हणवणाऱ्यांच्या मनगटात ताकद नाही.. अन नवी पिढी म्हटलं तर नव्या पिढीकडे सुसूत्रता नाही असं माझं मत आहे… गेली ६७ वर्षे जे प्रस्थापित लोक होते, त्यांनी लढा सुरु ठेवला… ६७ वर्षे झाली.. लढा सुरूच ठेवला असं आमचं मत आहे.
गुरुजी : लढा सुरु ठेवण्यापेक्षा लढा टोकदार ठेवणे अधिक महत्वाचे आहे वत्सा.. नुसता लढा लांबवून पसरवणं याला लढा म्हणत नाहीत.. जर त्या लढ्याचा आतापर्यंत निकाल लागला असता तर तो लढा यशस्वी मानला गेला असता. अनेकवेळा या लढ्याचा निकाल लागण्याची परिस्थिती होती. पण लढा लांबवत मूळ उद्देशाला बगल देत, आपली दुकानं चालू ठेवली असं लोकांचं मत आहे. आणि त्या मतांशी मी सहमत आहे.
शिष्य : गुरुजी आमच्या नेत्यांवर हे आरोप फारच मोठ्या प्रमाणात आहेत असं वाटतंय..
गुरुजी : वत्सा, आरोप समज, किंवा पाठ थोपटणे समज, किंवा आणखी काहीही समज… हे वास्तव आहे, हे सत्य आहे… आणि जे सत्य आहे त्याचेच परिणाम मराठा मंदिर मध्ये झालेल्या बैठकीत दिसून आले आहेत. ज्येष्ठत्वाला कुणाचा विरोध नाही.. त्यांच्या कार्याला विरोध नाही.. पण नेत्यांनी बॅग आणि गाठोड्यांचं जे धोरण स्वीकारलंय याला विरोध सुरु आहे आणि या विरोधाची धार तीव्र होत आहे. या विरोधाची धार जितकी तीव्र होईल, तितकंच नेतेमंडळींना भविष्यात अवघड होणार आहे..
शिष्य : गुरुजी, तुम्हाला कोणतं सत्य माहीत आहे का?
गुरुजी : शिष्या, बंद दाराआड लपलेली गोष्ट बाहेर पडण्यापर्यंत वाट बघ…….!