Saturday, December 28, 2024

/

बेळगावमध्ये भाजप, काँग्रेसची एकमेकांवर कुरघोडी

 belgaum

बेळगाव लाईव्ह : येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार कडक उन्हात घाम गाळत आहेत. या दोन्ही पक्षांना बेळगाव लोकसभा मतदारसंघातील तीनही विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठ्या आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. काँग्रेसला बेळगाव (दक्षिण), अरभावी आणि गोकाक या विधानसभा मतदारसंघात तर भाजपला बेळगाव ग्रामीण, बेळगाव उत्तर आणि रामदुर्गमध्ये प्रतिकूल परिस्थितीवर मात करावी लागत आहे.

बेळगाव लोकसभा मतदार संघात माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांच्या विरोधात विद्यमान महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पुत्र मृणाल हेब्बाळकर निवडणूक रिंगणात आहेत. शेट्टर यांना या ठिकाणी प्रारंभी स्थानिक नेत्यांच्या मोठ्या विरोधाला तोंड द्यावे लागले. मात्र कालांतराने आता सर्व कांही सुरळीत झाले आहे.

‘बाहेरील व्यक्ती’ हा शेट्टर यांच्यावरील शिक्का हळूहळू पुसला गेला असून जे भाजपसाठी सकारात्मक ठरत आहे. विधानसभा निवडणूक 56 हजार मताधिक्याने जिंकणाऱ्या लक्ष्मी हेब्बाळकर यांचा बेळगाव ग्रामीण मतदार संघ तसेच बेळगाव उत्तर आणि रामदुर्ग वगळता शेट्टर यांना इतरत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे.

बेळगाव मतदार संघातील आसिफ सेठ हे काँग्रेसचे आमदार आहेत. या मतदारसंघात मुस्लिम, पंचमसाली लिंगायत आणि अनुसूचित जाती -जमातीचे (एससी/एसटी) मतदार बहुसंख्येने आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणचे काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर पंचमसाली समुदायाचे आहेत. राहता राहिला प्रश्न रामदुर्ग मतदार संघाचा या मतदारसंघात मागील विधानसभा निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार असलेले आणि भाजपच्या अधिकृत उमेदवारासमोर पराभूत झालेले माजी आमदार महादेवप्पा यादवाड यांची भेट घेऊन शेट्टर यांनीच वादाला तोंड फोडले आहे.

चिक्करेवण्णा यांच्या आधी महादेवप्पा यांची भेट घेण्याच्या शेट्टर्सच्या निर्णयावर चिक्करेवण्णा यांच्या अनुयायांनी आक्षेप घेतला आहे. यामुळे शेट्टर यांना पाठिंबा देण्याचा निर्णय या दोन्ही नेत्यांनी राखून ठेवला आहे.

जारकीहोळी बंधुंसमोर हेब्बाळकर यांचे मोठे आव्हान : काँग्रेस उमेदवार मृणाल हेबाळकर यांना बेळगाव लोकसभा मतदारसंघात स्थानिक असण्याबरोबरच पंचमसाली समुदायातील असल्याचा अतिरिक्त फायदा आहे. मात्र तरीही या काँग्रेस उमेदवाराला गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी आणि अरभावीचे आमदार भालचंद्र जारकीहोळी यांच्या आव्हानाला तोंड द्यावे लागत आहे. जारकीहोळी आणि हेबाळकर यांच्यातील हाडवैर या निवडणुकीतही पहावयास मिळत आहे. दोन्ही जारकीहोळी बंधूंनी हेब्बाळकर यांच्या विरोधात जाहीररित्या जगदीश शेट्टर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. दुसरीकडे हेब्बाळकर यांनी या दोन्ही बंधूंच्या मतदारसंघांमध्ये जास्तीत जास्त दिवस प्रचार करण्याचे तंत्र अवलंबले आहे. मृणाल हेब्बाळकर यांना भाजपच्या विद्यमान आमदारांच्या बेळगाव दक्षिण मतदार संघात आव्हानाला तोंड द्यावे लागत आहे. कारण या मतदारसंघातून विद्यमान आमदारांनी गेल्या तीन लोकसभा निवडणुकीमध्ये वर्चस्व राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.