बेळगाव लाईव्ह विशेष :भाजप आणि काँग्रेसने आपल्या उमेदवारांची घोषणा केल्यापासून बेळगाव लोकसभेची जागा सातत्याने प्रसिद्धीच्या झोतात आहे. याला कारणीभूत भाजपने माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना दिलेली उमेदवारी, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आपल्या मुलाला निवडणूक रिंगणात उतरवणे आणि जारकीहोळी बंधू व लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यातील सततचे वैर, हे तीन प्रमुख मुद्दे आहेत. या मुद्द्यांची मोठ्या प्रमाणात चर्चा होत असल्याने त्यांचा बेळगावच्या राजकारणासह राज्याच्या राजकारणावरही दीर्घकालीन प्रभाव राहू शकतो.
शेट्टर भाजपमधील नेतृत्वाची पोकळी भरून काढतील का?
विशेषत: माजी मंत्री उमेश कट्टी, माजी केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी आणि माजी आमदार आनंद मामणी यांच्या निधनानंतर पक्षाला जिल्ह्यात नेतृत्वाची कमतरता भासू लागल्यामुळे भाजपने जगदीश शेट्टर यांना बेळगाव लोकसभा निवडणुकीची उमेदवारी दिली. जर शेट्टर निवडणुकीत विजयी झाले तर नेतृत्वाची पोकळी ते भरून काढतील. शेट्टर हे ज्येष्ठ राजकारणी आहेत आणि त्यांनी बेळगावमधील आपल्या उमेदवारीविरोधातील बंडखोरी मोडून काढत दोन आठवड्यात आपली क्षमता दाखवून दिली आहे. आपल्या उमेदवारीला विरोध दर्शविणाऱ्या नेतेमंडळींना स्वतः जातीने भेटून शेट्टर यांनी सर्वांना आपल्या बाजूने वळविण्यात यश मिळविले आहे. आता जारकी होळी बंधूंसह सर्व भाजप नेत्यांनी शेट्टर यांना आपला पाठिंबा जाहीर करून त्यांचा मतदान प्रवास सुकर केला आहे.
हेब्बाळकर पॉवरहाऊस घराणे बनेल का?
बेळगाव जिल्ह्यात अनेक प्रभावी राजकीय घराणी आहेत. ज्यांचे जिल्ह्याच्या एखाद्या किंवा अनेक विभागांवर वर्चस्व, राज्य आहे. यापैकी एकाच घराण्यातील तीन आमदार आणि एक विधान परिषद सदस्य (एमएलसी) असलेल्या जारकीहोळी घराण्याचे जिल्ह्यावर अधिक नियंत्रण आहे यात शंका नाही. मंत्री सतीश जारकीहोळी यांची कन्या प्रियांका जारकीहोळी निवडणूक रिंगणात असल्यामुळे आता या कुटुंबाची दुसरी पिढी राजकारणात उतरली आहे.
कत्ती हुक्केरी आणि जोल्ले या घराण्यांनी आपली राजकीय शक्ती दीर्घकाळ अबाधित राखली आहे. या घराण्यातील नेत्यांना लोक प्रेमाने ‘सावकार’ म्हणतात. आता हेब्बाळकर घराणेही या यादीत समाविष्ट होणार का? ते ही लोकसभा निवडणूक ठरवेल. लक्ष्मी हेब्बाळकर या आधीच राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत आणि त्यांचे बंधू चन्नराज हट्टीहोळी हे विधान परिषद सदस्य (एमएलसी) आहेत. आता जर त्यांचे चिरंजीव मृणाल हेब्बाळकर यांनी लोकसभा निवडणूक जिंकली तर जारकीहोळींनंतर आपल्या घराण्यात अधिक राजकीय शक्ती जमा करणारे हे दुसरे कुटुंब असेल आणि त्याचा परिणाम जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणावर नक्कीच होईल.
जारकीहोळी घेणार का बदला?
गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी आणि मंत्री लक्ष्मी हब्बाळकर यांच्यातील वैराला गेल्या 2018 मधील पीएलडी बँकेच्या निवडणुकीपासून सुरुवात झाली, जे गेली पाच वर्ष सुरूच आहे. रमेश जारकीहोळी अश्लील सीडी प्रकरणात अडकले, त्यावेळी हे वैर टोकाला पोचले होते. त्यावेळी रमेश यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
मागील विधानसभा निवडणुकीमध्ये बेळगाव ग्रामीण मतदार संघामधून हेब्बाळकर यांच्या विरोधात रमेश यांनी नागेश मन्नोळकर या आपल्या उमेदवाराला उभे केले होते. तथापि हेब्बाळकर चांगल्या मत फरकाने विजयी झाल्या. आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जारकीहोळींना बदला घेण्याची आणखी एक संधी मिळाली आहे.
कारण हेब्बाळकर यांचे चिरंजीव मृणाल हे या निवडणुकीत उमेदवार आहेत. त्यामुळे यावेळी रमेश जारकीहोळी आपला बदला घेणार की हेब्बाळकरांचा विजयाचा सिलसिला कायम राहणार? याबाबत उत्सुकता आहे.