बेळगाव लाईव्ह :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येत्या रविवार दि 28 रोजी बेळगावमध्ये जाहीर प्रचार सभा होणार असून त्याची जय्यत तयारी सुरू आहे. भाजपचे बेळगाव लोकसभेचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी आज शुक्रवारी सकाळी मालिनी सिटी येथे जातीने भेट देऊन पंतप्रधानांच्या प्रचार सभेच्या पूर्वतयारीची पाहणी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी 28 एप्रिल रोजी बेळगाव दौऱ्यावर येत असून त्यानिमित्ताने ते बेळगावात वास्तव्य देखील करणार आहेत. शहरातील बी. एस. येडीयुरप्पा मार्गाशेजारी मालिनी सिटी येथे रविवारी सकाळी 10 वाजता पंतप्रधानांची जाहीर प्रचार सभा होणार आहे.
या सभेची जोरदार तयारी सुरू झाली असून मालिनी सिटी येथे भव्य शामियाना उभारण्यात आला आहे. त्याचप्रमाणे विस्तृत अशा व्यासपीठाची उभारणी, आसन व्यवस्थेची मांडणी वगैरे कामे सध्या सुरू आहेत.
पंतप्रधानांच्या सभेला जिल्ह्यातील मतदार प्रचंड संख्येने उपस्थित राहणार असल्याची शक्यता गृहीत धरून त्या दृष्टीने सध्याच्या रखरखत्या उन्हाळ्यात सावली, गारवा देणारा भव्य शामियाना उभारण्याबरोबरच त्या ठिकाणी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
बेळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार जगदीश शेट्टर यांनी आज शुक्रवारी सकाळी मालिनी सिटी येथील प्रचार सभेच्या शामियानाला भेट देऊन तेथे सुरू असलेल्या विविध कामांची पाहणी केली. तसेच कंत्राटदाराला आवश्यक सूचना केल्या. याप्रसंगी त्यांच्या समवेत खासदार मंगला अंगडी, माजी आमदार ॲड. अनिल बेनके भाजप नेते एम बी जिरली शंकरगौडा पाटील, विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ आदींसह जिल्ह्यातील भाजपची नेतेमंडळी उपस्थित होती.
दरम्यान, भाजप उमेदवार जगदीश शेट्टर यांच्या प्रचारासाठी बेळगावमध्ये येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात काहीसा बदल करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी उद्या शनिवारी 27 एप्रिल रोजी महाराष्ट्रात प्रचारासाठी येणार असल्याने प्रचारसभा आटोपून उद्या रात्री उशिरा त्यांचे बेळगावमध्ये आगमन होणार आहे. शहराजवळील काकतीनजीकच्या ‘वेलकम’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम असणार आहे.
सध्या त्या ठिकाणी देखील सुरक्षा व्यवस्था व अन्य आवश्यक तयारी केली जात आहे. शनिवारी मुक्काम केल्यानंतर रविवारी सकाळी 10 वाजता पंतप्रधान मालिनी सिटी येथे होणाऱ्या प्रचार सभेला संबोधित करणार आहेत. या सभेला माजी पंतप्रधान देवेगौडा, भाजपचे जेष्ठ नेते माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा, माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी, प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र वगैरेंसह भाजपचे ज्येष्ठ नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
आज मालिनी सिटी येथे पंतप्रधानांच्या प्रचार सभेच्या तयारीची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना भाजप उमेदवार जगदीश शेट्टर म्हणाले की, येत्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बेळगावमध्ये जाहीर प्रचार सभेला संबोधित करणार आहेत. त्याचप्रमाणे या सभेसाठी उद्या 27 रोजी त्यांचे बेळगावात वास्तव्य असणार आहे. पंतप्रधान रविवारच्या प्रचार सभेतील आपल्या जाहीर भाषणाला ठीक 10 वाजता सुरुवात करतील. या सभेला भाजपचे राज्यस्तरावरील ज्येष्ठ नेते आणि जिल्हा पातळीवरील नेते उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधानांचे सभास्थळी आगमन होईल, त्यावेळी प्रचंड कडेकोट सुरक्षा व्यवस्था असणार आहे. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी बेळगाव शहरासह जिल्ह्यातील सर्व मतदार बंधू -भगिनींनी आणि भाजप समर्थकांनी रविवारी तासभर आधी म्हणजे सकाळी 9 वाजता मालिनी सिटी येथे सभेच्या ठिकाणी हजर रहावे ही विनंती, असे आवाहन त्यांनी केले.
तसेच पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना बेळगाव व चिक्कोडी या दोन्ही लोकसभा मतदार संघातील भाजप उमेदवारांसाठी या ठिकाणी ही पंतप्रधानांची प्रचार सभा होणार आहे. त्यामुळे सर्व विधानसभा क्षेत्रातून या सभेला लाखोच्या संख्येने लोक जमा होणार आहेत असे सांगून प्रचार सभा वगळता पंतप्रधानांचा रोड शो वगैरे अन्य कोणताही कार्यक्रम नसल्याचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी स्पष्ट केले.