बेळगाव लाईव्ह :बेळगाव लोकसभा मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार महादेव पाटील यांचा शुक्रवारी 19 रोजी शक्तीप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे. यावेळी मराठी जनतेने एकत्र येऊन ताकद दाखवावी, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आले.
उमेदवार महादेव पाटील यांचा अर्ज भरण्यासाठी नियोजन संदर्भात गुरुवारी (दि. 18) खासबाग येथील प्रचार कार्यालयात महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक झाली. या बैठकीत समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांनी, बेळगाव लोकसभा निवडणुकीत आमची लढाई ही ताकद दाखवण्याची आहे.
आमच्या मतदाराने राष्ट्रीय पक्षांकडे जाऊ नये, यासाठी आम्ही आपला स्वाभिमान राखून निवडणूक लढवत आहोत. त्यामुळे उमेदवार महादेव पाटील यांचा अर्ज भरण्यासाठी मोठ्या संख्येने मराठी भाषिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले.
यावेळी शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण-पाटील, आर. एम. चौगुले, नगरसेवक रवी साळुंखे, मदन बामणे आदींनी मनोगत व्यक्त करून शुक्रवारी मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करण्याचा निर्धार केला.
ढोल ताशांसह सहभागी व्हा
उमेदवार महादेव पाटील यांचा अर्ज दाखल करण्यासाठी मराठी भाषिकांनी ढोल-ताशे, भगवे फेटे, बैल गाड्यांसह सकाळी 10.30 वाजता धर्मवीर संभाजी चौकात उपस्थित राहण्याचे आवाहन म. ए. समितीने केले आहे.