बेळगाव लाईव्ह : चिकोडी आणि बेळगाव लोकसभा मतदार संघाच्या भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवार दि. २८ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी बेळगाव दौऱ्यावर येत आहेत.
शनिवार दि. २७ एप्रिल रोजी नरेंद्र मोदी यांचे बेळगावमध्ये आगमन होणार असून या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव ‘नो फ्लाय झोन’ घोषित करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ एप्रिल रोजी बेळगावच्या मालिनी सिटी येथे आयोजिलेल्या जाहीर सभेला उपस्थित राहणार आहेत. देशात मोदी फिव्हर मोठ्या प्रमाणात असल्याने मोदींच्या बेळगाव भेटीदरम्यान मोदी समर्थकांकडून ड्रोनद्वारे छायाचित्रीकरण होण्याची शक्यता आहे.
मात्र सुरक्षेच्या कारणास्तव बेळगाव जिल्हा प्रशासनाने बेळगाव तालुका हद्दीत २७ एप्रिल रोजी सकाळी ८ ते २८ एप्रिल रोजी सायंकाळी ६ या वेळेत मानवरहित हवाई वाहने तसेच ड्रोनचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.
या आदेशाचे उल्लंघन झाल्यास शहर पोलीस आयुक्तांकडून आवश्यक ती कारवाई करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आली आहे.