बेळगाव लाईव्ह : गेली अनेक वर्षे लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने उमेदवार दिला नव्हता. त्याचा परिणाम असा झाला कि मराठी मतदार हळूहळू राष्ट्रीय पक्षांना मतदान करण्याच्या प्रवाहात आला.
अनेक निवडणुकांमध्ये समितीचा लोकसभेसाठी उमेदवारच नसल्यामुळे साहजिकच मतदार राष्ट्रीय पक्षाला मतदान करण्याच्या परिस्थितीत गेला. त्यामुळे काही मतदारांना राष्ट्रीय पक्षांना मत घालण्याची सवय पडली. आणि त्यातून विधानसभा निवडणुकीच्या वेळी लोक समितीला मत देण्या ऐवजी राष्ट्रीय पक्षांनाच मत देऊ लागली. याचा परिणाम दोन वेळा समितीचा उमेदवार निवडून न येता राष्ट्रीय पक्षांचाच उमेदवार निवडून आला.
या सर्व परिस्थितीचा साकल्याने विचार करून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने खानापूर येथे समितीचा उमेदवार देण्याचे ठरविले. निवडणूक प्रक्रिया पार पडली. उमेदवार निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी निरंजन सरदेसाई नामक युवकाचे नाव पुढे आले. निरंजन सरदेसाई हा असा उमेदवार आहे, ज्याला सरदेसाई घराण्याचा राजकीय वारसा आहे.
त्यांचे काका निळकंठराव सरदेसाई आमदार म्हणून कार्यरत होते. त्याचबरोबर त्यांचे वडील उदयसिंहराव सरदेसाई राजकीय जाणकार, उत्कृष्ट वक्ते आणि खानापूर तालुक्यावर प्रभाव असणारे नेते म्हणून ओळखले जात होते.
कित्येकवेळा संधी असूनही उदयसिंह सरदेसाई यांनी आमदारकीला उभं राहणं टाळलं, त्यामुळे या घराण्याची हळूहळू पीछेहाट होत गेली. कायम प्रसिद्धीच्या झोतात असणारे हे कुटुंब निवडणुकीच्या रिंगणातून बाजूला हटल्यामुळे त्यांच्यावरचा प्रकाश थोडा जरी हटला असला तरीदेखील त्यांचं निश्चित प्रभावक्षेत्र खानापूर तालुक्याला अधोरेखित करणारे आहे. त्यामुळे निरंजन सरदेसाई नावाच्या युवकाला महाराष्ट्र एकीकरण समितीने उमेदवारी दिली आणि समितीच्याच एकंदर वातावरणात नवचैतन्य निर्माण झालं.
लोकसभा निवडणुकीत समिती उमेदवारच देत नसल्याने, जे मराठी मतदार सातत्याने समितीला मतदान करतात त्यांना समिती उपरी वाटू लागली. केवळ सोपस्कार म्हणून काँग्रेस किंवा भाजपाला मतदान करणे, इतकंच त्यांच्या हातात उरलं. कारण समिती हा पर्यायच नसल्याने परंपरागत मत टाकण्याचा हक्क त्यांनी बजावला पण तो राष्ट्रीय पक्षांसाठी! त्यामुळे सगळे मतदार हळूहळू राष्ट्रीय पक्षाकडे सरकू लागले. या निवडणुकीत पाठिंब्याचा विचार करून समितीने यावर्षी उमेदवार दिला. समितीचा उमेदवार हा नेहमीच सर्वसामान्य कार्यकर्त्यातून निवडला जातो. त्याप्रमाणेच बेळगावचा आणि खानापूरचा उमेदवार हा सर्वसामान्य गटातून आलेलेच उमेदवार आहेत.
निरंजन सरदेसाई यांच्या उमेदवारीची चर्चा खानापुरात जोरदार सुरु झाली. ‘माऊथ पब्लिसिटी’ इतकी जोरदार होती कि समिती निवडणूक लढते याचंच समितीला अप्रुब वाटत होतं. घरोघरी आपसूकच निरंजन सरदेसाई यांचं नाव पोहोचलं आणि प्रचाराची बऱ्यापैकी गती पकडली गेली. या सर्व गोष्टींचा विचार केला असता एक बाब लक्षात येते, कि समितीने नेहमी उमेदवार देणं गरजेचं आहे. आणि समितीने ज्या ज्या वेळी कोणत्याही निवडणुका येतात त्या निवडणुका पूर्ण ताकदीनिशी लढणं गरजेचं आहे.
कारण समितीचा हा एकगठ्ठा मतदार जसा आहे, तशीच समितीची राबणारी ‘टीम’ आहे. जी अन्य पक्षाकडे अजिबातच नाही. समितीचा कार्यकर्ता हा समितीचा कणा आहे. आणि कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सर्व बाजूनी सक्षम आहे. तर यावेळी समितीच्या या जमेच्या बाजूचा निरंजन सरदेसाई कशापद्धतीने लाभ उठवतात हे पाहणे गरजेचे आहे.