बेळगाव लाईव्ह:परिवहन मंडळाच्या बस चालकांना रात्रपाळी आधी 9 तासांची सक्तीची विश्रांती देण्यात यावी, अशी सूचना परिवहन महामंडळाने सर्व विभागीय नियंत्रकांना केली आहे. त्यामुळे यापुढे बस चालकांना रात्रपाळीवर पाठविण्याआधी त्यांची 9 तासांची विश्रांती पूर्ण झाली आहे का? हे पाहूनच सेवेवर पाठविले जाणार आहे.
परिवहन मंडळाच्या बसेसचे वाढते अपघात, चालकांचा निष्काळजीपणा आदी बाबींवर चर्चा करण्यासाठी नुकत्याच पार पडलेल्या परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत उपरोक्त निर्णय घेण्यात आला.
कामाचा अधिक ताण आणि विश्रांती नसताना आंतरराज्य व लांब पल्ल्याच्या बसेस वर चालकांचे होणारे नियोजन वगैरे कारणांमुळे अपघाताच्या घटना वाढीस लागल्याचे स्पष्ट झाले आहे. विश्रांती न घेता ओव्हर ड्युटी केल्याने बस चालकांवर कामाचा अधिक ताण राहू लागला आहे.
पुरेशी विश्रांती मिळत नसल्याने त्यांची दमछाक होतो असून अपघात घडत आहेत. त्यामुळे सर्व विभागीय नियंत्रक अधिकाऱ्यांनी मोटार वाहतूक कामगार अधिनियम 1961 नुसार चालकांना नियमित विश्रांती देण्यासाठी पावले उचलावीत असा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.
या निर्णयानुसार परिवहन महामंडळाने बस चालकांना रात्रपाळी आधी पुरेशी विश्रांती मिळावी यासाठी विश्रांतीची वेळ 9 तास इतकी निश्चित केली आहे.