Saturday, November 16, 2024

/

“जहां काँग्रेस आई वहा बर्बादी लाई” – पंतप्रधान मोदी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :देशाचे नुकसान होणाऱ्या गोष्टींबद्दल खोटे पसरवण्याचे काम करणारे काँग्रेस निवडणुकीतील होट बँकसाठी देशाचा स्वातंत्र्यलढा व तुष्टीकरणाचा वापर करत आहे. होटबँकसाठी काँग्रेसचे शहजादे भारताच्या राजा -महाराजांना शिव्या देऊन त्यांचा अवमान करत असून काँग्रेसचे देश हिताशी कांही देणे घेणे नाही. तेंव्हा “जहां काँग्रेस आई वहा बर्बादी लाई” हे लक्षात ठेवा, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काँग्रेसवर घणाघाती टीका केली.

जुने बेळगाव येथील मालिनी सिटी येथे बेळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर आणि चिकोडी मतदारसंघातील भाजप उमेदवार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रचारार्थ आज रविवारी सकाळी आयोजित भव्य प्रचार सभेमध्ये ते बोलत होते. “भारत माता की जय” या घोषणेसह बेळगाव चिक्कोडीय सहोदर -सहोदरीयेगे नमस्कार गळू. ताई पुर्णेश्वरी मत्तू माॅ सौंदत्ती यल्लमा को प्रणाम करता हू असे म्हणत आपल्या भाषणाची सुरुवात करताना पंतप्रधान मोदी यांनी प्रथम कर्नाटकातील सर्व मतदारांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की कर्नाटकात मी जिथे जिथे गेलो तेथे ‘फिर एक बार मोदी सरकार’ हा एकच स्वर ऐकायला मिळाला. आपण सर्वजण छ. शिवाजी महाराज, संत श्री बसवेश्वर यांचे अनुसरण करणारे लोक आहोत.

छ. शिवाजी महाराजांनी शक्तिशाली भारताच्या निर्मितीसाठी आपले जीवन खर्च केले तर संत महात्मा बसवेश्वर यांनी आपल्यासाठी लोकशाहीचा रस्ता बनवला. गेल्या 10 वर्षात केंद्रातील भाजप एनडीए सरकारने देशाला शक्तिशाली बनविले आहे. आता जगभरात “लोकशाहीची जननी” अशी भारताची ओळख निर्माण झाली आहे. देशातील 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर पडले आहेत. हे असे घडते तेंव्हा सर्व देशवासीयांचा आत्मविश्वास वाढतो. भाजप देशहित साधत असताना काँग्रेस मात्र देशहितापासून दूर गेले आहे. ते परिवार हितामध्ये गुंतून पडले आहे.

काँग्रेसने कोरोना लस, एचएएल, आता ईव्हीएम मशीन यांच्याबद्दल खोटे पसरवण्याचे काम केले आहे. भारताच्या यशाची त्यांना लाज वाटते. ईव्हीएमबद्दल खोट्या अफवा पसरवण्याद्वारे काँग्रेसने एक प्रकारे भारताच्या लोकशाहीला बदनाम केले आहे. तथापि आता सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेसला चांगली चपराक दिली आहे. प्रश्न हा आहे की देशाचे नुकसान होणाऱ्या गोष्टींबद्दल खोटे पसरवण्याचे काम काँग्रेस कोणाच्या सांगण्यावरून करत आहे? ईव्हीएमबद्दल खोटे बोलून देशाच्या लोकशाहीला बरबाद करण्याचे षडयंत्र काँग्रेसने रचले. यासाठी त्यांनी संपूर्ण देशाची माफी मागावयास हवी. भाजप व एनडीए सरकारने गेल्या 10 वर्षात राहणीमान सुलभतेसाठी बरेच परिश्रम घेतले आहेत. न्याय संहितेत सकारात्मक बदल करताना स्वातंत्र्यानंतर देखील काँग्रेसकडून अंमलात आणले जाणारे ब्रिटिशांचे अन्यायकारक कायदे हटविले आहेत. भारताच्या न्याय संहितेत दंडाला नाही तर न्याय मिळण्याला प्राधान्य दिले आहे. दुसऱ्यांवर अत्याचार करणाऱ्यांसाठी आता कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

कर्नाटकात काँग्रेस सत्तेवर आल्यापासून राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. बेळगावमध्ये एका आदिवासी महिलेवर अत्याचार झाला, चिकोडीत जैन मुनिंवर अन्याय झाला. अलीकडेच हुबळीमध्ये कॉलेज आवारात नेहा नामक मुलीची हत्या झाली, ज्यामुळे देशात खळबळ उडाली. या पद्धतीच्या संतापजनक लाजिरवाण्या घटनांमुळे काँग्रेसने राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे. नेहा हत्या प्रकरणात काँग्रेस तुष्टीकरण करत दबाव तंत्राचा अवलंब करत आहे. त्यांना नेहा सारख्या मुलींची चिंता नाही, होटबँकची चिंता आहे. बेंगलोर कॅफेमध्ये बॉम्बस्फोट झाला ते प्रकरण देखील काँग्रेसने गांभीर्याने घेतलेले नाही, असा आरोप करून ‘तुम्हाला जमत नसेल तर हे घर सोडून जावे’ असे पंतप्रधान काँग्रेस सरकारला उद्देशून म्हणाले.Modi speech

मतांसाठी काँग्रेस पीएफआय सारख्या भाजप एनडीए सरकारने बंदी घातलेल्या देश विघातक पक्षाशी हात मिळवणी करत आहे. काँग्रेसने देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास होटबँक आणि तुष्टीकरणाच्या नजरेने लिहिला आहे. तोच इतिहास पुढे नेण्याचे काम काँग्रेसचे शहजादे करत आहेत. या शहजाद्याने भारतातील राजे -महाराजे अत्याचारी होते. मनमानीपणे गरिबांच्या जमिनी बळकावत होते असे वक्तव्य केले आहे. या पद्धतीने त्यांनी छ. शिवाजी महाराज, कित्तूर राणी चन्नम्मा यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वांचा अपमान केला आहे. स्वातंत्र्य लढ्यात म्हैसूरच्या वडेयर या राजघराण्याचे मोठे योगदान आहे. या घराण्याचा देशाला अभिमान आहे. शहजाद्याने केलेले वक्तव्य म्हणजे या घराण्याचाही अवमान आहे. राजा महाराजांना नावे ठेवणाऱ्या या शहजाद्याची भारताच्या इतिहासात नवाब, निजाम, सुलतान, बादशहा यांनी केलेल्या अन्वयीत अन्याय -अत्याचारा बाबतीत बोलती बंद होते. औरंगजेबाने शेकडो मंदिर तोडली, अगणित स्त्री-पुरुषांवर अन्याय अत्याचार केले. अशा औरंगजेबाचे गुणगान करणाऱ्या पक्षाशी काँग्रेस युती करत आहे. शहजाद्याला राजा महाराजांचे कार्य दिसत नाही, मात्र होट बँकसाठी त्यांना बदनाम करण्याचे काम मात्र होत आहे. काँग्रेसची तुष्टीकरणाची मानसिकता देशासमोर उघडपणे समोर आली आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये देखील ती दिसून येते. काँग्रेस जेथे येते तेथील विकास दूर जातो. कर्नाटकात भाजप सत्तेवर असताना येथे विदेशी गुंतवणूक होत होती. मात्र आता काँग्रेस सत्तेवर आल्यापासून रस्ते, जलसिंचन वगैरे विकास कामे बंद आहेत असे सांगून “जहां काँग्रेस आई वहा बर्बादी लाई” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

आपला देश लहान शेतकऱ्यांचा देश आहे. त्यामुळे कृषी क्षेत्राच्या विकासासाठी शेतकऱ्यांमध्ये एकजूट निर्माण केली जात आहे असे सांगून कृषी क्षेत्र आणि शेतकऱ्यांसाठी भाजप व एनडीए सरकार राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती पंतप्रधानांनी दिली. शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्रातील भाजप सरकार कर्नाटक सरकारच्या सहकार्याने शेतकऱ्यांच्या खात्यात 10 हजार रुपये जमा करत होते. तथापि या ठिकाणी सत्तेवर येतात काँग्रेसने राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणारे 4000 रुपये देणे बंद केले आहे. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना मोदींचे 6 हजार रुपयेच मिळत आहेत आणि यापुढेही ते मिळत राहतील असे सांगून कर्नाटक सरकार जे पाप करत आहे त्याला या निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवाने उत्तर दिले जावे, असे पंतप्रधान म्हणाले.

काँग्रेसचे शहजादे भाऊ-बहीण निवडणूक जिंकली तर देशाचा एक्स-रे करणार असे म्हणत आहेत. याचा अर्थ देशातील नागरिकांची मालमत्ता, सोने-चांदी, गाड्या वगैरे सर्वांचा एक्स-रे होणार आहे. थोडक्यात प्रत्येकाच्या घरावर छापा मारून त्यांची मालमत्ता -संपत्ती हडप करून ती आपल्या होट बँकमध्ये वाटण्याचा या लोकांचा डाव आहे असे सांगून तुम्ही आपल्या मुलांसाठी जमवलेली आपली संपत्ती -मालमत्ता अशी लुटू देणार का? असा सवाल पंतप्रधान मोदी यांनी केला. तसेच जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत काँग्रेसचा हा मनसुबा कधीही सफल होणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. या निवडणुकीसाठी काँग्रेसने “इनहॅरीटन्स अ‍ॅक्ट” हा एक नवा फॉर्मुला तयार केला आहे. दिल्लीत त्यांचे सरकार बनले तर या कायद्यानुसार तुम्ही तुमच्या मुलाबाळांसाठी जी बचत -पुंजी जमवलेली असेल त्यामध्ये कराच्या स्वरूपात 55 टकके सरकारचा वाटा असेल. थोडक्यात हा कर लादून आपल्या होट बँकचे हित साधण्याचा त्यांचा डाव आहे. भाजप -एनडीए सरकारने कित्तूर राणी चन्नम्मा यांच्यापासून प्रेरणा घेऊन संरक्षण दलात महिलांसाठी द्वारे खुली केली आहेत.

भारत सरकारच्या नीतीमुळे सेंट्रल पोलीस फोर्समध्ये महिलांची संख्या वाढली आहे. थोडक्यात तुमची स्वप्न हाच मोदींचा संकल्प आहे. तुमचे स्वप्न साकारण्यासाठी माझा क्षण आणि क्षण तुमच्यासाठी देशासाठी असणार आहे असे स्पष्ट करून बेळगाव मतदार संघातील जगदीश शेट्टर आणि चिक्कोडी मतदारसंघातील अण्णासाहेब जोल्ले या भाजपच्या उमेदवारांना सर्वांनी जास्तीत जास्त मतांनी विजयी करावे. यासाठी प्रत्येकाने घरोघरी जाऊन जनजागृती करावी. प्रत्येकाने ‘पहिले मतदान फिर जलपान’ असे मनाशी निश्चित करून सकाळी 10 पूर्वी मतदान करावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्याचप्रमाणे आम्हाला पूर्वीचे सर्व विक्रम मोडायचे आहेत. त्यासाठी प्रत्येक मतदान केंद्र जिंकायचे आहे. माझी उपस्थित सर्वांना विनंती आहे की त्यांनी आपल्या गावातील घरोघरी जाऊन माझा नमस्कार प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवावा. प्रत्येक कुटुंबाच्या आशीर्वादाने मला नवी ऊर्जा मिळते आणि मी अधिक जोमाने कामाला लागतो असे सांगून “भारत माता की जय” या घोषणेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सांगता केली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.