बेळगाव लाईव्ह :म. ए. समितीचे कार्यकर्ते सचिन केळवेकर व त्यांचे बंधू सुंदर केळवेकर यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी शहापूर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन छेडून निवेदन सादर केले.
राजकीय वैमनस्यातून महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते सचिन केळवेकर व त्यांचे बंधू सुंदर कळवेकर यांना कांही जणांनी घरात घुसून मारहाण केल्याची घटना काल शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून गुन्हा नोंद झाला असला तरी पोलिसांकडून अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही.
त्यामुळे आज रविवारी सकाळी मोठ्या संख्येने जमलेले महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते व केळवेकर कुटुंबीय यांनी शहापूर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन छेडून हल्लेखोरांना तात्काळ गजाआड करण्याची मागणी केली. त्याचप्रमाणे तशा आशयाचे निवेदन शहापूर पोलिसांना सादर केले. याप्रसंगी शुभम शेळके, चंद्रकांत कोंडुसकर, दत्ता जाधव सागर पाटील ,अंकूश केसरकर आदी युवा नेतेमंडळी देखील उपस्थित होती.
यावेळी बेळगाव लाईव्हशी बोलताना शुभम शेळके म्हणाले की, आमचे सहकारी सचिन केळवेकर यांच्यावर काल रात्री हल्ला झाल्यानंतर एफआयआर दाखल करून घेणाऱ्या पोलिसांनी आज सकाळपर्यंत कोणतीच कारवाई केली नसल्यामुळे आज आम्ही महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्वजण येथे जमलो आहोत. हल्लेखोरांना तात्काळ अटक करावी अशा मागणीचे निवेदन आम्ही येथील पोलिस अधिकाऱ्यांना दिले आहे.
काल जो हल्ला झाला त्याचा मराठी भाषिक निश्चितपणे निषेध करणार नाहीत. कारण महाराष्ट्र एकीकरण समिती आजपर्यंत शांततेच्या मार्गाने लढा देत असताना काल जो नीच भ्याड हल्ला झाला तो पाहता हल्लेखोरांनी स्वतःचा विचार करावा. कारण आजपर्यंत मराठी मुलांचा वापर करून देशोधडीला लावण्याचे काम ही लोकं करत आहेत. आजपर्यंत कुठलाही नेता त्या युवकांच्या पाठीशी उभा राहिलेला नाही. तेंव्हा त्या युवकांच्या पालकांनीच खऱ्या अर्थाने विचार करून आपल्या मुलांना कोणाच्या पाठीशी उभे करायचे याचा गांभीर्याने विचार करावा. या ठिकाणी आमच्या मराठी मुलांमध्येच भांडणे लावून त्यांचे आयुष्य बरबाद करण्याचे काम हे लोक करत आहेत.
आता आमचे सहकारी केळवेकर यांना जर न्याय मिळाला नाही तर भविष्यात जे घडेल त्याची जबाबदारी त्यांची असेल. आज देखील आम्ही कायद्याचा सन्मान करतो. पोलिसांनी देखील हल्लेखोरांना लवकरच अटक करू असे आश्वासन दिले आहे. मात्र तसे न घडल्यास मराठी भाषिकांच्या तीव्र प्रतिक्रियेला त्यांना सामोरे जावे लागेल, असा इशारा शेळके यांनी दिला.