बेळगाव लाईव्ह : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीची मते हि नेहमी निर्णायक ठरत आली आहेत. याच पार्श्वभूमीवर मराठी भाषिकांच्या मतांचा टक्का निवडणुकीच्या माध्यमातून दर्शविण्यासाठी आजवर समितीने लोकसभा निवडणूक लढविली आहे.
यंदा होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी अद्याप समितीने आपला उमेदवार निश्चित केला नसून आतापर्यंत केवळ एकच उमेदवाराने आपला अर्ज दाखल केला होता.
शनिवार दि. ६ एप्रिल हि अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत असून आज समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते महादेव पाटील यांनी उमेदवारीसाठी समिती निवड कमिटीकडे अर्ज सादर केला आहे.निवड कमिटीकडे अर्ज सुपूर्द केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना महादेव पाटील म्हणाले, आजवर दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी मराठी भाषिकांच्या विरोधातच काम केले आहे.
मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी बेळगावमध्ये उभारण्यात आलेली सुवर्णसौध हि भाजपचे बेळगाव लोकसभेचे उमेदवार जगदीश शेट्टर यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात निर्माण करण्यात आली आहे. सरकारच्या मराठी विरोधी ध्येयधोरणाला उत्तर देण्यासाठी समिती आजवर लढत आली असून आपण गेल्या ५१ वर्षांपासून समितीमध्ये कार्यरत आहे.
समितीची सर्व आंदोलने, गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात आजवर झालेल्या प्रत्येक आंदोलनात आपण सक्रिय सहभाग घेतला आहे. माझ्या या पार्श्वभूमीचा विचार करून समितीच्या निवड कमिटीने मला लोकसभा उमेदवारी द्यावी, अशी मी विनंती करत असल्याचे ते म्हणाले.
माजी महापौर कै. संभाजी पाटील यांच्या स्नुषा साधना सागर पाटील यांनी गेल्या दोन दिवसांपूर्वी आपला अर्ज निवड कमिटीकडे सादर केला असून आज महादेव पाटील यांनी दुसरा अर्ज सादर केला आहे.
शनिवार दि. ६ एप्रिल हि अर्ज सादर करण्यासाठीची अंतिम तारीख असून उद्यापर्यंत किती जणांचे अर्ज निवड कमिटीकडे सादर होतात, आणि अंतिम उमेदवाराचे नाव निवड कमिटी कधी जाहीर करेल, याकडे सर्व मराठी भाषिकांचे लक्ष लागून राहिले आहे.