बेळगाव लाईव्ह : आपापसात कांही मतभेद असतील तर ते बाजूला ठेवून आपण सर्वांनी मराठी अस्मिता, मराठी संस्कृती आणि मराठी भाषेच्या संरक्षणासाठी संघटीतपणे महादेव तुकाराम पाटील यांच्या पाठीशी राहून त्यांना विजयी करणे गरजेचे आहे, असे मत तालुका म. ए. समितीचे कार्याध्यक्ष आणि माजी आमदार मनोहर किणेकर यांनी व्यक्त केले.
बेळगाव लोकसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार महादेव पाटील यांच्या प्रचार कार्यालयाचे आज समिती नेत्यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. खासबाग डबल रोड परिसरात प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
महाराष्ट्र एकीकरण समिती कोणत्याही निवडणुका सीमालढ्याचा एक भाग म्हणून लढवत असते. प्रत्येक निवडणुकीत मराठीचे वर्चस्व अधोरेखित करणे हेच एकमेव उद्दिष्ट समितीने ठेवले आहे. गेल्या ६७ वर्षांपासून सीमाभाग महाराष्ट्रात सामील व्हावा या मागणीसाठी मराठी भाषिक लढा देत आहेत. मात्र मराठी माणसाला हद्दपार करण्यासाठी कर्नाटक सरकार अनेक क्लृप्त्या लढवत आहे.
मराठी भाषा, संस्कृती, मराठी भाषिक आणि मराठी भाषिकांच्या जमिनी यावर स्वतःची मक्तेदारी दाखवून मराठी माणसाचे वर्चस्व संपविण्याचा कुटील डाव कर्नाटक सरकारने आखला आहे. कर्नाटक सरकारचा हा कुटील डाव उधळण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत मराठी भाषिकांची ताकद दाखविण्याची वेळ आली आहे, अशी प्रतिक्रिया माजी आम. मनोहर किणेकर यांनी व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले, कर्नाटक सरकारकडून येनकेन प्रकारे सीमावासीयांवर अन्याय -अत्याचार होत आहेत. कानडीची सक्ती केली जात आहे. नामफलकांवर 60 टक्के कन्नडची जबरदस्ती केली जात आहे, तर दुसरीकडे मराठी माणसाला आर्थिक दृष्ट्या कमकुवत करण्यासाठी त्यांच्या जमिनी काढून घेऊन ती जमीन विकासासाठी वापरली जाते. तो विकास कर्नाटकच्या कानडी लोकांच्या खिशात घालणे, संपादित केलेली जमीन वेगवेगळ्या कारणासाठी घेऊन कानडी लोकांना वाटप करणे, अशी कूटनीती कर्नाटक सरकार राबवत आहे.
सीमाभागातील मराठी माणूस आर्थिक दृष्ट्या कमकुवत झाल्यानंतर येथील मराठी मतदार कमी होऊन कानडी मतदार कसे वाढतील या पद्धतीने त्यांची जी वाटचाल सुरू आहे. हि वाटचाल जर रोखायची असेल तर आपण सर्वांनी एकत्रित येऊन संघटीतरित्या मराठी माणसाची ताकद दाखवणं अत्यंत गरजेचे आहे. यासाठी येत्या ७ मे रोजी होणाऱ्या मतदानादिवशी समितीचे उमेदवार महादेव पाटील यांना मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष रणजीत चव्हाण पाटील, समिती नेते रमाकांत कोंडुसकर, आर. एम. चौगुले, प्रकाश मरगाळे, आजी माजी नगरसेवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.