बेळगाव लाईव्ह :निवडणूक प्रचारातील वैमनस्यातून म. ए. समितीच्या दोघा कार्यकर्त्यांवर घरात घुसून हल्ला करणाऱ्या 5 जणांना शहापूर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणातील उर्वरित आरोपी फरारी असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
अटक केलेल्या आरोपींची नावे शुभम महादेव पोटे (वय 24), श्रीराम उर्फ लोण्या महादेव पोटे (वय 25, दोघेही रा. कचेरी गल्ली शहापूर), अजय महादेव सुगने (वय 29, रा. रामदेव गल्ली वडगाव), बाळकृष्ण उर्फ किशन मारुती मंडोळकर (वय 23, रा. हट्टीहोळ गल्ली शहापूर) आणि मंगेश उर्फ सोन्या यशवंत कित्तूर (वय 22, रा. आनंदवाडी शहापूर) अशी आहेत.
मराठा योद्धा मनोज जरांगे -पाटील यांच्या सभेची जागृती करण्यासंदर्भात गेल्या शनिवारी मध्यरात्री राष्ट्रीय पक्षांच्या एका टोळक्याने लक्ष्मी रोड, भारतनगर, शहापूर येथील म. ए. समितीचे कार्यकर्ते सचिन केळवेकर यांच्या घरावर हल्ला केला होता.
त्यावेळी चाकू व लोखंडी रॉडने हल्ला करत दगडफेकीही करण्यात आली होती. या हल्ल्यात सचिन शांताराम केळवेकर (वय 36) व त्यांचे बंधू सुंदर शांताराम केळवेकर (वय 32) हे दोघे गंभीर जखमी झाले होते. तसेच आणखी एक भाऊ नितीन केळवेकर व आई लक्ष्मी केळवेकर यांनाही धक्काबुक्की झाल्याने ते देखील जखमी झाले होते.
सदर प्रकरणी शहापूर पोलिसांनी काल सोमवारी 5 जणांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे. याप्रकरणी शहापूरचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर तिगडी अधिक तपास करीत आहेत.