बेळगाव लाईव्ह : तब्बल ३० वर्षानंतर आयोजिण्यात आलेली बेळगाव तालुक्यातील पश्चिम भागातील बिजगर्णी, कावळेवाडी व राकसकोप या तिन्ही गावांच्या महालक्ष्मीदेवी यात्रा मोठ्या उत्साहात सुरु झाली आहे.
मंगळवारी सकाळी विधिवत पूजा – अर्चा पार पडल्यानंतर यात्रोत्सवाला सुरुवात झाली. बुधवारी या यात्रेचा मुख्य दिवस असून हजारो भाविकांच्या उपस्थितीत रथोत्सव आयोजिण्यात आला होता. भंडाऱ्याची उधळण, उदो गं आई उदो चा गजर आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात अमाप जल्लोषात रथोत्सव सोहळा पार पडला.
यात्रोत्सव कमिटीच्यावतीने यात्रेला येणाऱ्या भाविकांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यात आल्या असून यात्रेच्या पार्श्वभूमीवर रस्ते, पाणी, वीज, बससेवा यासह अनेक पायाभूत सुविधा पूर्णत्वास आणण्यात आल्या आहेत.
येथील प्राथमिक मराठी शाळेच्या आवारात महालक्ष्मी देवीची यात्रा भरविण्यात आली असून शाळेच्या आवारात सुवर्णमंडपाची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे. या मंडपात आज सायंकाळी देवी विराजमान होणार आहे.
मंगळवारी सायंकाळी विधिवत पूजा करून ग्रामस्थांच्या उपस्थितीत हळदी सोहळा पार पडला. तर बुधवारी सूर्योदयाला अक्षतारोपण करून देवीचा विवाह पार पडला. यानंतर हजारो भाविकांच्या उपस्थितीत गावभर देवीची रथातून मिरवणूक निघाली असून रथोत्सवानंतर सायंकाळी ५ च्या दरम्यान मराठी शाळेजवळील सभा मंडपात देवी गदगेवर विराजमान होणार आहे.
त्यानंतर गावच्यावतीने देवीची ओटी भरण्यात येणार आहे. नऊ दिवस ही यात्रा होणार असून यात्रोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यात्रा काळात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी राकसकोप, बिजगर्णी आणि कावळेवाडी गावांना जादा बसची सोय करण्यात आली आहे. मंगळवारपासून मध्यवर्ती बसस्थानकात ही विशेष बस उपलब्ध करण्यात आली आहे.
सकाळी ८ पासून रात्री उशीरापर्यंत ही बससेवा उपलब्ध राहणार आहे. शक्ती योजनेमुळे महिला प्रवाशी बसला अधिक प्राधान्य देत आहेत. त्यामुळे यात्रा काळाकरिता अतिरिक्त बससेवा पुरविली जाणार आहे, अशी माहितीही परिवहनने दिली आहे.