बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र एकीकरण समिती ज्यावेळी निवडणुकीच्या आखाड्यात उतरते त्यावेळी एकंदर सीमाभागाचे वातावरण आणि राजकीय समीकरण वेगळेच दिसून येते.
कोणत्याही आमिषाशिवाय स्वेच्छेने, स्वयंस्फूर्तीने आणि उत्स्फूर्तपणे प्रचाराच्या कामासाठी सहभागी होणारे मराठी भाषिक, तळमळीने दिल्या जाणाऱ्या घोषणा आणि जनतेच्याप्रती उमेदवाराच्या भावना या साऱ्या गोष्टी एखाद्या चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे दिसून येतात. महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार महादेव पाटील यांनी आज पदयात्रेच्या माध्यमातून शहापूर भागात प्रचार केला. यावेळी संपूर्ण शहापुरात संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी परिसरात नवचैतन्य संचारल्याचा भास झाला.
गल्लोगल्ली पदयात्रेचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. जोरदार घोषणा, हारतुरे घालून उमेदवाराचे जंगी स्वागत, महिलावर्गाकडून केले जाणारे औक्षण आणि पाठीशी राहण्याचे खंबीर पाठिंबा देणारा हात यामुळे वातावरण भारावून गेले होते. गेल्या ६७ वर्षात समितीने लढवलेल्या निवडणुकांमध्ये अपवाद वगळता नेहमीच असे वातावरण पाहायला मिळाले आहे.
आजवर राष्ट्रीय पक्षांनी मतदारांना विविध आमिषे, प्रलोभने देऊन प्रचार यंत्रणेत गुंतवलेले आपण पाहिले आहे. परंतु महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बाबतीत मात्र हे समीकरण अगदीच विरुद्ध आहे. समितीसाठी मराठी भाषिक पदरमोड करून उमेदवारालाच पाठिंबा देतात, हे उल्लेखनीय आहे.
आगामी लोकसभा निवडणूक समितीकडून सीमावासीयांवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराविरोधात लढविली जात आहे. मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी माणूस या गोष्टींना लक्ष्य करून सुरु असलेले कर्नाटकी राजकारण याला प्रत्त्युत्तर देण्यासाठी समिती निवडणूक आखाड्यात उतरली असून प्रचाराच्या पहिल्याच पदयात्रेत मराठी भाषिक जनतेचा उत्साह ओसंडून वाहात असलेला दिसून आला.
आजच्या पदयात्रेत समिती नेते रमाकांत कोंडुसकर, प्रकाश मरगाळे, रणजीत चव्हाण पाटील, सुधा भातंकांडे ,रवी साळुंके, माजी महापौर महेश नाईक,राजू पाटील,दत्ता जाधव,विकास कलघटगी, धनंजय पाटील, बळवंत शिंदोळकर, किरण हुद्दार, पाटील, संजय शिंदे,राकेश पलांगे ,राजू बिर्जे मनोहर हलगेकर आदींसह समितीचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मराठी भाषिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.