Wednesday, December 25, 2024

/

शक्ती प्रदर्शनाने समिती उमेदवार महादेव पाटील यांचा नामांकन अर्ज दाखल

 belgaum

बेळगाव लाईव्ह : हर हर महादेव, जय भवानी जय शिवाजी, म. ए. समितीचा विजय असो अशा जयकारात भव्य मिरवणुकीच्या माध्यमातून मराठी अस्मितेचे दर्शन घडवत महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार महादेव पाटील यांनी आज शक्ती प्रदर्शनाद्वारे लोकसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार महादेव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शुक्रवारी सकाळी शहरातील धर्मवीर छ. संभाजी महाराज चौकात असंख्य कार्यकर्ते व मराठी भाषिक जमा झाले होते.

भगवे फेटे बांधून, हातात भगवे ध्वज घेऊन जमलेल्या या स्त्री-पुरुष कार्यकर्त्यांमुळे संपूर्ण चौक भगवामय झाला होता. प्रारंभी उमेदवार महादेव पाटील यांनी चौकातील धर्मवीर छ. संभाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्याद्वारे त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर पारंपरिक मराठा पद्धतीनुसार सजवलेल्या बैलगाडीतून ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मिरवणुकीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने रवाना झाले.

यावेळी समितीचे धडाडीचे नेते रमाकांत कोंडुसकर हे स्वतः उमेदवार पाटील यांच्या बैलगाडीचे सारथ्य करत होते. धर्मवीर छ. संभाजी महाराज चौकातून यंदे खूट, कॉलेज रोड, कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघालेल्या मिरवणुकी दरम्यान हर हर महादेव, बेळगाव -कारवार -निपाणी -बिदर -भालकी सहसंयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, महाराष्ट्र एकीकरण समितीचा विजय असो, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी संपूर्ण मार्ग दणाणून सोडला होता.

बेळगाव शहर, उपनगरासह ग्रामीण भागातील शेकडो स्त्री-पुरुष कार्यकर्ते व मराठी भाषिकांचा सहभाग असणारी उमेदवार महादेव पाटील यांची ही मराठी अस्मिता दर्शवणारी मिरवणूक साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती. जिल्हाधिकारी कार्यालय आवारात मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर उमेदवार महादेव पाटील यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी समिती नेते रमाकांत कोंडुसकर, धनंजय पाटील, शुभम शेळके आदी उपस्थित होते.

दरम्यान, सकाळी धर्मवीर छ. संभाजी महाराज चौक येथे मिरवणुकीला प्रारंभ होण्यापूर्वी बेळगाव लाईव्ह समोर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना समिती उमेदवार महादेव पाटील म्हणाले की, बेळगाव लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षावर बाहेरून उमेदवार मागवण्याची लाजिरवाणी वेळ आली आहे, तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाचे उमेदवार स्वतःच्या आईच्या कर्तुत्वावर निवडणूक लढवत आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीने 51 वर्षाच्या संघर्षानंतर एका सर्वसामान्य निष्ठावंत कार्यकर्त्याला लोकसभा निवडणुकीची उमेदवारी देऊन बेळगाव सीमाभागात एक नवा पायंडा पाडला आहे. त्यामुळे राष्ट्रीय पक्षांच्या साठमारीत महाराष्ट्र एकीकरण समितीचा विजय निश्चित आहे.Mes nomination

बेळगाव सीमाभागात मराठी संस्कृती टिकवणे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणे, सुपीक शेत जमीन उध्वस्त करणाऱ्या बायपास, रिंग रोडची निर्मिती थांबवणे, मराठी शेतकऱ्यांच्या जमिनी गिळंकृत करण्याचे षडयंत्र हाणून पाडणे, बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला दिल्लीत वाचा फोडणे अशा प्रमुख उद्देशाने महाराष्ट्र एकीकरण समिती ही निवडणूक लढवत आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन समितीने महाराष्ट्र एकीकरण समितीने आपण तळागाळातील कार्यकर्त्यांची कदर करतो आणि करत राहू हे दाखवून दिले आहे.

इतर उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी जाताना पैसे देऊन कार्यकर्ते जमवावे लागत असताना समिती उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी आज इतक्या प्रचंड संख्येने समिती कार्यकर्ते आणि मराठी भाषिक स्वयंस्फूर्तीने स्वखर्चाने येथे जमले आहेत. हा समिती उमेदवार आणि इतर उमेदवारांमधील फरक आहे असे सांगून मी महादेव पाटील म्हणजे फक्त एक प्रतीक आहे खऱ्या अर्थाने महाराष्ट्र एकीकरण समिती ही निवडणूक लढवत असून समितीचा विजय निश्चित आहे, असा विश्वास उमेदवार महादेव पाटील यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.