बेळगाव लाईव्ह : जगदीश शेट्टर हे स्वार्थी राजकारणी आहेत. बाहेरचा माणूस नेहमी बाहेरचाच माणूस असतो आणि घरचा मुलगा हा नेहमी घरचाच मुलगा असतो, अशा शब्दात मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी जगदीश शेट्टर यांच्यावर बोचरी टीका केली.
आज बेळगाव जिल्हा न्यायालयात लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांच्या समर्थनार्थ मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मतयाचना केली. यावेळी माजी आमदार फिरोज सेठ आणि विद्यमान आमदार असिफ सेठ यांनीही पाठिंबा दर्शविला.
यावेळी पार पडलेल्या बार असोसिएशनच्या बैठकीनंतर बोलताना लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, २०१३ पासून मृणाल हेब्बाळकर जनतेच्या सेवेत आहेत. २०१३ साली त्यांनी विधानसभा निवडणूक लढविली होती. मात्र यावेळी पराभव पत्करावा लागला होता. यानंतर मृणाल हेब्बाळकर यांनी जनतेची सेवा करून जनतेचा पाठिंबा मिळविला. पराभवाचे आव्हान स्वीकारून ज्या मतदार संघात काँग्रेसला पराभव पत्करावा लागला, त्या मतदारसंघासह अनेक ठिकाणी जनतेत जाऊन जनतेचा विश्वास संपादन करण्यात त्यांना यश मिळाले आहे.
माझे बंधू चन्नराज हट्टीहोळी यांच्याप्रमाणेच त्यांनाही सामाजिक बांधिलकी आहे. याउलट जगदीश शेट्टर यांच्यामुळे बेळगावचे नुकसान झाले आहे. ऑक्सिजन प्लांट बेळगावमध्ये येण्याऐवजी धारवाडला हलविण्यात आला, जगदीश शेट्टर हे बाहेरचे आहेत. बाहेरचे लोक कधीही आपले होऊ शकत नाहीत, अशा शब्दात मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी जगदीश शेट्टर यांना टोला लगावला.
यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष किवडसन्नावर, विजय पाटील, प्रशांत वडेयार, आर.पी.पाटील, आर.के.पाटील, बी.एस.सुलतानपुरी आदींसह अनेकांची उपस्थिती होती.