बेळगाव लाईव्ह :कृष्णा नदीमध्ये महाराष्ट्रातून 2 टीएमसी पाणी आणि हिडकल जलाशयातून तीन कालव्यांच्या माध्यमातून 1 टीएमसी पाणी सोडण्याद्वारे शेतकऱ्यांची पाण्याची सोय करून देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.
यमकनमर्डी येथे आज रविवारी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे आणि पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या जनतेसह जनावरांना पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागल्यामुळे आमच्या सरकारच्यावतीने नुकतीच महाराष्ट्र सरकारला विनंती करण्यात आली आहे.
आमच्या विनंतीला मान देऊन सध्या महाराष्ट्रातून 2 टीएमसी पाणी कृष्णा नदीत सोडले जाणार आहे. मीदेखील हिडकल जलाशयामधून 3 कालव्यांद्वारे पहिल्या प्रयत्नातच 1 टीएमसी पाणी सोडण्यात यशस्वी झालो आहे.
वर्षातून एकदा पाणी सोडण्याचा हा प्रयत्न निरंतर सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिकांनी पाण्याचा विनाकारण अपव्यय न करता सदुपयोग करावा, असे आवाहन मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले.
दरम्यान, कृष्णा नदीत पाणी सोडण्याद्वारे पाण्याची सोय करून दिल्याबद्दल शेतकऱ्यांनी मंत्री जारकीहोळी यांना धन्यवाद दिले आहेत.