बेळगाव लाईव्ह : हुबळी येथील एका खाजगी महाविद्यालयातील तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यभरात आंदोलने छेडण्यात येत असून या घटनेचे लोण आता बेळगावपर्यंत पसरले आहे. हुबळीत झालेल्या खून प्रकरणाच्या निषेधार्थ आज बेळगावमध्ये विविध संघटनांच्या वतीने निषेध मोर्चा काढून आंदोलन छेडण्यात आले.
हुबळी येथील युवतीचा खून प्रेमप्रकरणातून झाल्याचे सत्ताधारी गटातील मंत्र्यांनी सांगितले. मात्र विरोधकांनी हे प्रकरण उचलून धरत याला राजकीय रंग देत या घटनेमागे एकाच व्यक्तीचा हात नसून आणखी काही जणांचा किंवा गटाचा समावेश असल्याचा आरोप केला आहे.
शिवाय या प्रकरणात सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आरोपीला संरक्षण देत असल्याचा आरोपही केला आहे. या प्रकरणाला एका गटाने राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला आहे तर एका गटाने हे प्रकरण वैयक्तिक पातळीवरील असून याचा राजकारणासाठी वापर न करण्याचे आवाहन केले आहे.
आज बेळगावमध्ये छेडण्यात आलेल्या आंदोलनात बहुसंख्य नागरिकांनी संहभाग घेतला होता. या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अन्यथा संघटनांच्या हवाली करावे, किंवा आरोपीचा एन्काउंटर करावा, अशा मागण्या करण्यात आल्या. नेहा हिरेमठ सारख्या अनेक तरुणींचे जीव आज धोक्यात आहेत, महिलांना राज्यात संरक्षण नाही यासारखे आरोप करत राज्यसरकारवर ताशेरेही ओढण्यात आले.
धर्मवीर संभाजी चौकापासून सुरु झालेला मोर्चा कॉलेज रोडमार्गे चन्नम्मा चौकात येऊन थांबला. यावेळी विविध संघटनांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन सादर करण्यात आले.
गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान राज्यात असेच प्रकरण झाले होते. या निवडणुकीदरम्यान हुबळीच्या तरुणाचा मुद्दा उचलून धरत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत अडकवले होते. त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा हुबळीमध्ये हत्याकांड घडले असून याप्रकरणावरून भाजपकडून काँग्रेसला कोंडीत अडकवण्याचा प्रयत्न सुरु आहे.
ऐन निवडणुकीच्या तोंडावरच हे प्रकरण घडल्याने याला अधिक राजकीय रंग मिळत असल्याचे जाणकारांचे मत आहे. शिवाय राजकारणाच्या गोंधळात निवडणुकीनंतर हे प्रकरण आपोआप शांत होईल आणि पीडित कुटुंब दुर्लक्षित राहील अशी भीतीही व्यक्त होत आहे.