Friday, January 3, 2025

/

गरज ऐतिहासिक, मर्दानी खेळांच्या व्यसनाची!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : आपल्या देशाला युद्धकलेची मोठी परंपरा लाभली आहे. ही परंपरा जोपासण्यासाठी आणि संवर्धन करण्यासाठी अनेक राज्यांत विविध प्रयत्न सुरू आहेत. सोशल मीडिया, मोबाईल, इंटरनेटच्या व्यसनापासून मुक्तता मिळविण्यासाठी आज प्रत्येकजण धडपडत आहे. सोशल मीडियामुळे आज अबालवृद्ध अनेक आजारांचा सामना करत आहेत. लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सातत्याने हातात मोबाईल घेऊन, मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या प्रत्येकाला आज व्यायामाची नितांत गरज आहे. भारतात शिवकालीन युद्ध कला सर्वत्र प्रसिद्ध आहे. स्वराज्य स्थापनेत छत्रपती शिवाजी महाराजांना महत्त्वाचे योगदान देणाऱ्या युद्ध कलेला मर्दानी खेळ म्हणून ओळखले जाते.

महाराष्ट्रात शासकीय पातळीवर हे खेळ टिकविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. याचसोबत व्यक्तिगत पातळीवरदेखील या खेळाची परंपरा जपण्यासाठी मोठे प्रयत्न केले जात आहेत. बेळगावमध्ये अनेकठिकाणी मर्दानी खेळांचे विशेष प्रशिक्षण वर्ग भरविले जातात. विशेषतः बेळगावमध्ये दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या ऐतिहासिक शिवजयंती दरम्यान हे प्रशिक्षण वर्ग घेतले जातात.

बसवण कुडची या गावानेही हि परंपरा जपली असून गुढी पाडव्यानिमित्ताने मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके आयोजिली जातात. हे खेळ पाहण्यासाठी अबालवृद्ध एकवटतात आणि या खेळांमध्ये अधिक रस दाखवतात हे विशेष. हि कला जोपासण्यासाठी बेळगावमध्ये अनेक वर्षांपासून अनेक वस्ताद यासाठी काम करत आहेत.Lathi

शिवकालीन युद्धकला ही माणसाला परिपूर्ण बनविणारी कला आहे. बेळगावात साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती उत्सव मिरवणुकीत तसेच गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत याची विशेष झलक पाहायला मिळते. बेळगावमध्ये या दोन्ही उत्सवांच्या मिरवणुकीत मर्दानी खेळातील प्रत्येक क्षण याची देही याची डोळा अनुभवायला मिळतात. दांडपट्टा, तलवारबाजी, लाठीकाठी अशा मर्दानी खेळांचा समावेश असणाऱ्या खेळांमुळे मिरवणुकीत नवचैतन्य अनुभवयला मिळते. अलीकडे तरुणांसह तरुणीही या खेळात अग्रेसर असलेल्या पाहायला मिळतात.

विशेष म्हणजे नऊवारी साडी नेसून कित्येक तरुणी या खेळात सहभागी होताना दिसून येतात. बेळगावमध्ये निघणाऱ्या मिरवणुकीत मध्यंतरी डीजेने स्थान पटकावले होते. मात्र अलीकडच्या काळात शिवकालीन ढोल, ताशा आणि वाद्यांसह मर्दानी खेळांची परंपराही मोठ्या प्रमाणात रुजलेली दिसून येते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेली मर्दानी खेळांची परंपरा आज बेळगावमध्ये तब्बल ३५० वर्षानंतरही जपली जाते हे महत्वाचे आहेच. परंतु या खेळासंदर्भात युवापिढीमध्ये जागृती होणे गरजेचे आहे. या खेळांची संपूर्ण माहिती, योग्य प्रशिक्षण घेऊन खेळाच्या परंपरेसह आपल्या शरीराची तंदुरुस्तीही युवापिढीने राखणे अत्यंत महत्वाचे आहे.

मर्दानी खेळ हे केवळ प्रात्यक्षिके दाखवून प्रदर्शन मांडण्यासाठी नसून या खेळांमुळे शरीराची हालचाल होते. शरीराचा व्यायाम होतो. शरीर तंदुरुस्त राहते. यासाठी या खेळांचे महत्व जाणून भावी पिढीने या परंपरेचा मोल राखणे गरजेचे आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.