बेळगाव लाईव्ह:हलगा -मच्छे बायपास रस्त्याच्या विरोधातील न्यायालयीन लढा शेवटी शेतकरी जिंकणार आहेत. मात्र तोपर्यंत शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासन, राजकीय नेते आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या कोणत्याही भूलथापा व आमिषांना बळी न पडता संघटित रहावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते प्रगतशील शेतकरी रमाकांत कोंडुसकर यांनी केले.
सुपीक शेतजमीन उध्वस्त करणाऱ्या हलगा -मच्छे बायपास रस्त्याच्या विरोधातील लढ्याची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज बुधवारी सकाळी येळ्ळूर रोड बायपास येथे शेतकऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत कोंडुसकर बोलत होते.
ते म्हणाले की, केंद्र व राज्य सरकार प्रशासनाला हाताशी धरून शेतकऱ्यांवर दबाव तंत्र वापरून हा हलगा -मच्छे बायपास रस्ता उभ्या पिकावर बुलडोझर फिरवून जबरदस्तीने केला जात आहे. या संदर्भात आम्ही शेतकरी बांधवांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने सदर रस्त्याच्या कामाला स्थगिती आदेश दिला आहे. याबद्दल मी न्यायालयाचा मनापासून आभारी आहे. माझ्या शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी वगैरे कोणीही असो त्यांनी जर सदर रस्त्याचे काम पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास शेतकऱ्यांनी तात्काळ आपल्या नेतेमंडळींशी संपर्क साधावा.
शेतकऱ्यांनी कोणत्याही भूलथापा अथवा आमिषांना बळी पडू नये. कारण हा लढा आपल्या भूमातेचा आपल्या अस्तित्वाचा आहे. तेंव्हा बेळगावचा रिंग रोड असो, हलगा -मच्छे बायपास रस्ता असो किंवा खादरवाडी, येळ्ळूर येथील जमीन असो आपल्या भूमातेला वाचविण्यासाठी येत्या काळात आपण सर्वांनी संघटित होऊन आपला लढा तीव्र करायचा आहे. असे सांगून प्रशासन किंवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून मोठ्या रकमेचे आमिष दाखविण्यात आल्यास शेतकऱ्यांनी त्यांना भीक घालू नये, असे आवाहन रमाकांत कोंडुसकर यांनी केले.
येळ्ळूर रोड, बायपासच्या ठिकाणी झालेल्या आजच्या शेतकऱ्यांच्या बैठकीत शेतकरी नेते राजू मरवे यांनी हलगा मच्छे बायपास रस्त्याच्या विरोधातील शेतकऱ्यांच्या लढ्याची थोडक्यात माहिती देताना बेळगावचा ‘झिरो पॉईंट’ निश्चित झाल्याशिवाय हलगा -मच्छे बायपास रस्त्याचे काम केले जाऊ नये असा आदेश न्यायालयाने दिला असल्याचे सांगितले. तसेच सध्या जे दडपशाही करून जबरदस्तीने काम केले जात आहे. त्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी देखील दावा दाखल केला असल्याची माहिती देऊन यापुढे शेतकऱ्यांनी सजग व संघटित राहिले पाहिजे, असे मत मरवे यांनी व्यक्त केले.
आजच्या बैठकीस बरेच शेतकरी बंधू-भगिनी उपस्थित होते. दरम्यान न्यायालयाचा स्थगिती आदेश असतानाही बायपासवर आज काही मालवाहू गाड्यांची ये-जा सुरू होती. हा प्रकार निदर्शनास येताच शेतकऱ्यांनी त्या गाड्या अडवून त्यांच्या चालकांना चांगलाच जाब विचारून पुन्हा या ठिकाणी न फिरू नका, अशी तंबी दिली.