बेळगाव लाईव्ह:बदलते हवामान आणि कडक ऊन, उष्मामुळे मोठ्या प्रमाणात पाखरांचा प्रादुर्भाव होऊन खराब झालेल्या आपल्या दीड एकर फ्लॉवर पिकावर नाईलाजाने ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ एका शेतकऱ्यांवर आली असून त्यामुळे त्याचे सुमारे 3 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
माळी गल्ली येथील मोहन शंकर बडमंजी व महेश शंकर बडमंजी अशी या शेतकऱ्यांची नावे आहेत. बडमंजी बंधूंची गांधीनगर येथील हरी काका कंपाउंड च्या मागील बाजूस शेती आहे.
यंदा त्यांनी आपल्या शेतातील दीड एकरच्या गाद्यांमध्ये फ्लॉवरचे पीक घेतले होते. खतपाणी घालून सलग तीन महिने चांगली देखभाल केल्यामुळे पीक चांगले भरात आले होते. मात्र प्रतिकूल हवामान आणि वाढत्या उष्म्यामुळे पिकात काहीतरी गडबड झाल्याचे लक्षात येताच.
मोहन बडमंजी व महेश बडमंजी पिकाला 8 दिवसातून एकदा द्यावयाचे पाणी 4 दिवसातून एकदा देण्यास सुरुवात केली. मात्र त्याचा कांहीही फायदा न होता अचानक मोठ्या प्रमाणात पाखरांचा प्रादुर्भाव होऊन दीड एकर मधील फ्लॉवर पीक खराब झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संपूर्ण पीक काढून टाकण्याचा निर्णय घेऊन बडमंजी बंधूंनी आज मंगळवारी सकाळपासून पिकावर ट्रॅक्टर फिरवण्यास सुरुवात केली. या पद्धतीने चांगले बहरलेले संपूर्ण पीक वाया गेल्यामुळे बडमंजी बंधूंचे सुमारे 3 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबद्दल आपल्या शेतात बेळगाव लाईव्हला माहिती देताना शेतकरी मोहन शंकर बडबंजी म्हणाले की, हवामान बदल आणि रोगामुळे पाखर वाढवून आमचे हे फ्लॉवरचा पीक खराब झाले आहे. सुमारे दीड एकरच्या या संपूर्ण गाद्यात हे पीक घेण्यासाठी तीन महिने राबणूक झाली होती.
मात्र चांगल्या बहरलेल्या या पिकाला पाखरांचा प्रादुर्भाव होऊन हजारो रुपयांचे औषधपाणी, खत वाया गेले आहे. अति पाखरांमुळे संपूर्ण पीक खराब झाले असल्याने दीड एकरचे हे फ्लॉवरचे पीक आता ट्रॅक्टर फिरवून काढून टाकण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यानंतर येथे दुसरे एखादे पीक घेण्याचा विचार करावा लागणार आहे, असे शेतकरी मोहन बडबंजी यांनी सांगितले.