बेळगाव लाईव्ह : प्रवाशांच्या सामानाविनाच इंडिगो कंपनीचे विमान बेंगळुरूहून बेळगावला पोहोचल्याची अजब घटना उघडकीस आली आहे. इंडिगो कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या या गलथान कारभारामुळे प्रवाशांना विमानतळावर ताटकळत उभं राहावं लागण्याची वेळ आल्याने प्रवाशातून संताप व्यक्त करण्यात येत होता.
यासंदर्भात अधिक माहिती अशी कि, रविवारी संध्याकाळी इंडिगोच्या विमानातील चालक दलाने तब्बल 22 प्रवाशांचे सामान बेंगळुरूमध्येच सोडून दिले. बेंगळुरूहून बेळगावला आलेल्या प्रवाशांची सामानाविना भलतीच तारांबळ उडाली.
बेंगळुरूहून बेळगावला विमान उतरल्यानंतर सामानाची शोधाशोध सुरु झाली. मात्र तब्बल २२ प्रवाशांचे सामान न दिसल्याने प्रवासी गोंधळात बुडाले. यानंतर विमान कंपनीच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता काही मलेशियन विद्यार्थी विमानातून प्रवास करत असल्याने त्यांचे सामान अधिक असल्याने इतर प्रवाशांचे सामान आणणे शक्य नसल्याचे उत्तर देण्यात आले. यावेळी अधिक संतापलेल्या प्रवाशांनी विमान कंपनीच्या गलथान कारभारावर ताशेरे ओढत विमानतळावरच उशिरापर्यंत वाट पाहिली.
या विमानातून माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हेदेखील प्रवास करत होते. विशेष म्हणजे त्या २२ प्रवाशांमध्ये बसवराज बोम्मई यांचाही समावेश होता, हि आश्चर्याची बाब आहे. या विमानातून अनेक ज्येष्ठ नागरिक देखील प्रवास करत होते.
मात्र सामानाची बॅग बेंगळुरू मध्येच राहिल्याने औषधे आणि जीवनावश्यक साहित्यामुळे नागरिक हैराण झाले. प्रवाशांचे जे साहित्य मागे राहिले आहे त्यांचे साहित्य उद्या पोहोच करण्याचे आश्वासन व्यवस्थापन मंडळाने दिल्याने प्रवाशांनी अधिकच संताप व्यक्त केला.