बेळगाव लाईव्ह :जिल्हा पंचायत सभागृहात आज निवडणूक अधिकारी, खर्च निरीक्षक आणि विविध नोडल अधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत विशेष खर्च निरीक्षक बी. मुरुलीकुमार यांनी निवडणूक गैरप्रकारांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करता सिव्हिल मार्फत आलेल्या किंवा जनतेने केलेल्या तक्रारींची तत्काळ चौकशी करण्यात यावी, असे निर्देश दिले.
मतदानाची तारीख जवळ येत असल्याने अनियमितता टाळण्यासाठी कडक दक्षता घेण्यात यावी. कोणतीही तक्रार किंवा माहिती असल्यास तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तपासणी करावी. चेक पोस्टवर कार्यरत असलेल्या पथकांनी नेहमी सतर्क राहावे. एफएसटीच्या पथकांनी त्यांच्या परिसरात नियमित गस्त ठेवावी, अशी माहिती त्यांनी दिली.
तसेच संशयास्पद बँक व्यवहार तपासले पाहिजेत. याशिवाय आयकर, अबकारी, पोलीस आणि इतर पथकांनीही निवडणुकीतील अनियमितता शोधण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, असे विशेष खर्च निरीक्षक बी. मुरुलीकुमार यांनी सांगितले.
बैठकीला उपस्थित असलेल्या वाणिज्य कर विभागाच्या अधिकाऱ्यांनी अनियमितता शोधण्यासाठी त्यांची दैनंदिन तपासणी वाढविण्याची सूचना केली. बेळगाव लोकसभा मतदार संघातील अवैध निवडणूक प्रतिबंध व चेकपोस्ट कारभाराबाबतही माहिती देताना जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील म्हणाले की, निवडणूक मुक्त व निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
चिक्कोडी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी असलेले जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी, राजकीय पक्ष व उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्यात आले असून, अनियमितता टाळण्यासाठी सर्व पथके कार्यरत असल्याचे सांगितले.
यावेळी बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त इडा मार्टिन मारबानयांग, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमा शंकर गुलेद, बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे खर्च निरीक्षक हरकृपाल खटाना,
नरसिंग राव बी., चिक्कोडी लोकसभा मतदारसंघाचे खर्च निरीक्षक एन. मोहना कृष्णा, अंकित प्रोफेसर तिवारी, आय.एस.बी. शुक्ला आदींसह आदर्श आचारसंहिता, आयकर, व्यावसायिक कर, खर्च यासह विविध नोडल अधिकारी सहभागी झाले होते.