बेळगाव लाईव्ह :महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बेळगाव सीमाभागात प्रचारासाठी येऊ नये, अशा मागणीचे पत्र खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने महाराष्ट्राच्या सीमाभाग समन्वयक मंत्रांना धाडण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्टार प्रचारक असून बेळगाव आणि खानापूर येथे गुरुवारी 2 मे रोजी त्यांच्या जाहीर प्रचार सभा होणार आहेत. बेळगाव आणि कारवार लोकसभा मतदारसंघांमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीने आपले उमेदवार उभे केले असल्यामुळे आपण सीमाभागात प्रचार करण्याबाबत पुन्हा एकदा विचार करावा अशी विनंती खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने आपल्या पत्राद्वारे केली आहे.
प्रति माननीय मंत्री श्री शंभूराजे देसाई महाराष्ट्र राज्य मुंबई गुरुवार दि. 2 मे 2024 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे हे कारवार लोकसभा भाजपाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ खानापूरमध्ये येत आहेत असे आम्हाला समजले. त्या संदर्भात खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन आम्ही खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती आपणाला विनंती करू इच्छितो की, या मतदारसंघांमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार निरंजन उदयसिंह सरदेसाई हे महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार आहेत.
त्यासाठी आपण भारतीय जनता पार्टीच्या प्रचारात उपस्थित राहून जर सभा घेतली तर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात आपण आहात हे सिद्ध होईल. त्यासाठी आम्ही खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व पदाधिकारी आपणाला विनंती करतो की आपण सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात प्रचार करू नये जर आपण खानापुरात उपस्थित राहून प्रचार सभा घेतली तर नाईलाज आपणाला काळे झेंडे दाखवून आपला निषेध केला जाईल.
आपण दक्षता घ्यावी म्हणून आम्ही खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती आपणाला विनंती करतो -आपले नम्र अध्यक्ष गोपाळराव बळवंतराव देसाई महाराष्ट्र एकीकरण समिती खानापूर, असा तपशील समन्वयक मंत्र्यांना धाडण्यात आलेल्या पत्रात नमूद आहे.