बेळगाव लाईव्ह:लोकसभा निवडणुकीसाठी बेळगाव मतदारसंघात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येत्या गुरुवारी 2 मे रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात प्रचार करणार आहेत.
बेळगाव लोकसभा मतदारसंघात महादेव पाटील हे महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेनेचे एकनाथ शिंदे हे बेळगावात येऊन भाजप उमेदवारांचा प्रचार करणार आहेत पंत बाळेकुंद्री येथे आयोजित जाहीर सभेला ते संबोधित करणार आहेत मुख्यमंत्री शिंदे यांच्या तशा आशयाचा बेळगाव दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
त्या संदर्भात महाराष्ट्र एकीकरण समिती लवकरच पत्र व्यवहार करणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमाभागात प्रचारासाठी येऊ नये अशी मागणी केली जाणार आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी येणाऱ्या भाजपच्या स्टार प्रचारक नेतेमंडळींच्या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे देखील नांव आहे. तथापि एकीकडे संयुक्त महाराष्ट्र लढा, कन्नड सक्ती आंदोलनात कारावास भोगलेले एकनाथ शिंदे हे आता थेट सीमाप्रश्नी लढणाऱ्या मराठी माणसांच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार करतील का? हा प्रश्न आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे विशेष करून सीमाभागातील मराठी भाषिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
एकीकडे दोन मे रोजी भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळेकुंद्री जाहीर सभा घेणार आहेत तर दुसरीकडे 3 मे रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अण्णासाहेब जोले यांची प्रचार सभा घेणार आहेत.