बेळगाव लाईव्ह :सकल मराठा समाज व म. ए. समितीच्या सदस्यांनी आज मराठा योद्धा मनोज जरांगे -पाटील यांच्याशी सीमाप्रश्नासह बेळगावच्या विविध विषयांवर समग्र चर्चा केली. यावेळी प्रामुख्याने बेळगावसह सीमाभागातील मराठ्यांचे प्रश्न काय आहेत? याची माहिती देण्याबरोबरच आपण आपले हक्क कसे मिळवले पाहिजेत आणि गनिमी काव्याने हा लढा आपण कसा यशस्वी केला पाहिजे यावर चर्चा झाली.
बेळगावमध्ये महाद्वार रोड येथील छ. संभाजी महाराज उद्यानाच्या मैदानावर आज मंगळवारी सायंकाळी मराठा योद्धा मनोज जरांगे -पाटील यांची भव्य जाहीर सभा होणार आहे. यासंदर्भात त्यांना आणण्यासाठी गेलेल्या सकल मराठा समाज, बेळगाव व म. ए. समितीच्या पदाधिकारी सदस्यांनी आज सकाळी इचलकरंजी येथे त्यांची भेट घेतली.
यावेळी जरांगे -पाटील यांच्याशी त्यांची सुमारे तासभर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान बेळगाव रिंग रोड आणि हलगा -मच्छे बायपास रोडमुळे बहुतांशी मराठा समाजाच्या शेतजमिनी संपादित केल्यामुळे मराठा समाजावर विस्थापित होण्याची वेळ आली आहे. कर्नाटक राज्यात 70 लाखाहून अधिक म्हणजे सुमारे 74 लाख इतक्या संख्येत असणारा मराठी भाषिक मराठा समाज बेळगाव सीमाभागात 20 लाखांहून अधिक आहे. मात्र या समाजाचा कर्नाटकात कोणत्याही तऱ्हेने विकास झालेला नाही.
बेळगाव महानगरपालिकेवर असणारा भगवा ध्वज अन्यायाने काढून टाकण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मराठी भाषेतील फलक काढून बेळगावातील मराठी पुसण्याचा प्रयत्न सुरू आहे वगैरे प्रमुख मुद्दे मनोज जरांगे -पाटील यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. सदर तासभर चाललेल्या समग्र चर्चेमध्ये मराठा, मराठी भाषिकांशी संबंधित बेळगावचे विविध विषय, बेळगावच्या मराठ्यांचा प्रश्न काय आहे? सीमाभागातील मराठ्यांचा काय प्रश्न आहे?
आदींची माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे आपण कशी लढत दिली पाहिजे? आपले हक्क कसे मिळवले पाहिजेत आणि गनिमी काव्याने हा लढा आपण कसा यशस्वी केला पाहिजे? याबाबत सकल मराठा समाज व समितीच्या सदस्यांनी मनोज जरांगे -पाटील यांच्याशी चर्चा केली.