बेळगाव लाईव्ह : हुबळी येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनी नेहा हिरेमठ हिच्या खून प्रकरणी आज बेळगाव जिल्हा काँग्रेसने निषेध मोर्चाचे आयोजन केले होते. लोकसभा उमेदवार चन्नराज हट्टीहोळी यांच्यासह आमदार राजू सेठ आणि इतर काँग्रेस नेत्यांच्या नेतृत्वाखाली सदर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा काँग्रेस कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चात नेहा हिरेमठ खून प्रकरणाचा निषेध नोंदविण्यात आला. या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, नेहा हिरेमठ हिच्या आत्म्याला शांती मिळावी, अशा घोषणा देत निषेध मोर्चाचे काढण्यात आला.
यावेळी बोलताना विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी म्हणाले, नेहा हिरेमठ हत्याकांड हे माणुसकीला काळिमा फासणारे आहे. विकृत मनोवृत्तीने केलेल्या या कृत्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. या प्रकरणाचा काँग्रेसकडून निषेध व्यक्त करण्यात येत असून नेहाच्या आत्म्याला शांती लाभावी, न्याय मिळावा यासाठी गुन्हेगाराला कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी बोलून दाखविली.
महिलांवरील अन्यायाची प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्यासाठी विशेष न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय सरकारने यापूर्वीच घेतला आहे. काँग्रेस पक्ष महिलांसोबत आहे. नेहा हिरेमठच्या वडिलांनी या प्रकरणाचे राजकारण न करण्याचे आवाहन केले आहे. मात्र भाजपने या प्रकरणाचा राजकारणासाठी वापर केल्याचा आरोपही चन्नराज हट्टीहोळी यांनी केला.
या मोर्चात बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ, बाबासाहेब पाटील , काँग्रेस जिल्हाध्यक्ष विनय नवलगट्टी, ऍड. आर. पी. पाटील, आयेशा सनदी जयश्री माळगी, आदींसह काँग्रेस नेते, महिला कार्यकर्त्या आणि पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.