बेळगाव लाईव्ह:सीबीटी अर्थात बेळगाव मध्यवर्तीय बस स्थानकाच्या ठिकाणी सध्या वाढलेला भटक्या कुत्र्यांचा वावर प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत असून दहशत निर्माण करणाऱ्या या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकाच्या ठिकाणी सध्या बेवारस भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. कळपाने वावरणारी ही कुत्री बस स्थानकावर असलेल्या प्रवाशांच्या आसन व्यवस्थेच्या ठिकाणी ठाण मांडून बसत असल्यामुळे प्रवाशांची कुचंबना होत आहे.
आसने रिकामी असूनही कुत्र्यांच्या भीतीपोटी प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागत आहे. एखाद्या प्रवाशाने धाडस करून हुसकावण्याचा प्रयत्न केल्यास ही कुत्री त्याच्यावर गुरगुरतात. भटकी कुत्री बस स्थानकात ठाण मांडून बसण्यास खरंतर बऱ्याच प्रमाणात कांही प्रवाशीच जबाबदार आहेत. हा ठराविक प्रवासीवर्ग पाप बिचारी कुत्री म्हणून पशु प्रेमापोटी या भटक्या कुत्र्यांना बिस्किटे वगैरे अन्नपदार्थ खायला देतो.
या प्रकारे अनायासे बसल्या जागीच खाण्याची व्यवस्था होत असल्याने कुत्र्यांचा कळप देखील बस स्थानकावर निवांत विसावा घेताना दिसतो. तथापी या कुत्र्यांमुळे सध्या बस स्थानकात संबंधित ठिकाणी दहशतीचे वातावरण असते.
प्रसंगी गुरगुरणारी ही कुत्री एखाद्या वेळेस प्रवाशांना अपाय करू शकतात हे लक्षात घेऊन परिवहन मंडळाने बस स्थानकावरील या भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, जेणेकरून प्रवाशांना फलाटावर निर्धास्त वावरता येईल, अशी जोरदार मागणी जागरूक प्रवाशांकडून केली जात आहे.