बेळगाव लाईव्ह :केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत कोट्यावधी रुपयांचा निधी बेळगाव शहरासाठी उपलब्ध झाला असला तरी त्याचा कसा दुरुपयोग झाला हे सध्याच्या शहरातील विविध बस थांब्यांच्या दयनीय अवस्थेवरून लक्षात येते. दुरावस्था झालेले सदर बस थांबे सध्या असून नसल्यासारखे झाले असल्यामुळे प्रवासी व नागरिकात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
बेळगाव स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरातील जवळपास सर्व बस थांबांचे नूतनीकरण करण्यात आले आहे. मात्र हे नूतनीकरण केल्यानंतर त्यांच्या देखभालीकडे संबंधितांचे साफ दुर्लक्ष झाले आहे.
या व्यतिरिक्त परिवहन मंडळाचे बस चालक देखील नूतनीकरण करण्यात आलेल्या बस थांब्याऐवजी सोयीच्या ठिकाणी बसेस थांबवतात. परिणामी शहर उपनगरातील प्रामुख्याने आरएलएस कॉलेज समोरील बस थांबा, वडगाव येळ्ळूर क्रॉस येथील बस थांबा, अनगोळ नाका, मजगाव, भवानीनगर, रेल्वे ओव्हर ब्रिजनजिकचा जक्कीनहोंड बस थांबा हे आणि असे प्रवाशांसाठी सुसज्ज करण्यात आलेले अन्य बस थांबे गेल्या कांही महिन्यांपासून दुर्लक्षित होऊन त्यांना बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे.
सदर बस थांब्याचा वापरच होत नसल्यामुळे त्या ठिकाणची आसन व्यवस्था मोडकळीस आली असून काहींचे छतच गायब झाले आहे. कोणीच वाली नसल्यामुळे चांगल्या पत्र्याचे हे छत वादळी वाऱ्यामुळे उडाले की कोणी लंपास केले? हा संशोधनाचा विषय आहे.
या खेरीज प्रवाशांच्या सोयीसाठी त्यांना निवारा म्हणून उभारण्यात आलेल्या या बस थांब्यांपैकी कांही बस थांबे तर कार पार्किंगची ठिकाणे झाली आहेत. बस थांब्याच्या निवाऱ्याखाली वाहन चालक आपली वाहने बिनधास्त पार्क करत असतात. या पद्धतीने गेल्या बऱ्याच महिन्यापासून संबंधित बस थांब्याची दुरवस्था होऊन त्याचा गैरवापर केला जात असताना लोकप्रतिनिधींसह जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त वगैरे जबाबदार लोकांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल सर्वसामान्य विशेष करून जागरूक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सध्याचा होरपळून काढणारा उन्हाळा लक्षात घेता व्यवस्थित देखभाल झाल्यास सदर बस थांबे प्रवाशांना दिलासा देणारे ठरू शकतात. तेंव्हा याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या बस थांब्याची दुरुस्ती करून ते जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात यावेत. जेणेकरून सध्याच्या उन्हाळ्यात बसच्या प्रतीक्षेत ताटकळत उभ्या राहणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळू शकेल.
त्याचप्रमाणे परिवहन मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बस चालकांना बस थांब्याच्या ठिकाणीच बसेस थांबविण्याची सत्ता सूचना करावी. दुसरीकडे रहदारी पोलिसांनी शहर उपनगरातील बस थांब्यांच्या ठिकाणी वाहने पार्क केली जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी, अशी जोरदार मागणी प्रवासीवर्गासह जागरूक नागरिकांकडून केली जात आहे.