Sunday, November 17, 2024

/

भाजपच्या शक्तिप्रदर्शनात शहरात चक्काजाम!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव लोकसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला. मात्र उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भाजपने अवलंबिलेल्या शक्तिप्रदर्शनामुळे शहरात चारी बाजूंनी वाहतुकीची कोंडी झाल्याने वाहनधारकातून संताप व्यक्त करण्यात येत होता.

लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांकडून शक्ती प्रदर्शनाने उमेदवारी अर्ज भरले जात असते तरी त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला होता. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी झालेल्या गर्दीमुळे शहरातील वाहतूक विविध मार्गावरून वळविण्यात आली होती.

परिणामी ठिकठिकाणी वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. एकीकडे तापमानाचा वाढता पारा, उष्म्यामुळे हैराण झालेले नागरिक, डोक्यावर हेल्मेटचे ओझे, घामाच्या धारा आणि अशातच भाजपच्या शक्तिप्रदर्शनामुळे सर्वसामान्य नागरिकांना वाहने घेऊन शहराचे मारावे लागणारे हेलपाटे! या एकंदर वातावरणामुळे नागरिक भाजपच्या या शक्तिप्रदर्शनाबाबत जोरदार संताप व्यक्त करताना दिसत होते.

शहरातील विविध भागासह फोर्ट रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. रखरखत्या उन्हात हा प्रकार घडल्यामुळे वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. त्रस्त वाहन चालकांना आपली वाहने संथ गतीने हाकावी लागत असल्यामुळे एकच गर्दी होऊन रस्त्याच्या दुतर्फ़ा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.Traffic jam

गर्दीतून मार्ग काढताना वाहन चालकांना विशेष करून दुचाकी वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत होती. रस्ता वाहनांनी व्यापला गेल्यामुळे भर उन्हात रस्त्यावरून मार्ग काढताना पादचाऱ्यांना देखील त्रास सहन करावा लागत होता.

एखाद्या उमेदवाराने उमेदवारी अर्ज भरतेवेळीच नागरिकांची अशी गैरसोय केली तर निवडून आल्यानंतर पुढील पाच वर्षात नागरिकांची किती तारांबळ उडेल याचा विचारच न केलेला बरा! अशा उपहासात्मक टिप्पण्याही नागरिकांकडून ऐकायला मिळाल्या.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.