Saturday, December 28, 2024

/

बेनकनहळ्ळी श्री महालक्ष्मी यात्रेला भक्तिभावात प्रारंभ

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेनकनहळ्ळी, गणेशपुर (ता. जि. बेळगाव) येथे 33 वर्षानंतर भरत असलेल्या श्री महालक्ष्मी यात्रेला आज मंगळवारी सकाळी अपूर्व उत्साह आणि जल्लोषात भक्तीभावाने प्रारंभ झाला आहे.

बेनकनहळ्ळी येथे आजपासून सुरू झालेली श्री महालक्ष्मी देवीची यात्रा अजून सलग नऊ दिवस चालणार आहे. या यात्रेसाठी आज पहिल्याच दिवशी सकाळपासून पंचक्रोशीतील शेकडो भाविकांनी बेनकनहळ्ळी तेथे हजेरी लावली होती.

त्यांच्या उपस्थितीत सकाळपासून दुपारपर्यंत भंडाऱ्याची उधळण करत देवीच्या जय जयकारात रथ ओढण्याचा कार्यक्रम अपूर्व उत्साहात पार पडला. यावेळी झालेल्या सामूहिक आरतीप्रसंगी मंदिर परिसरातील रस्ते भाविकांनी फुलून गेले होते. एकंदर सध्या यात्रेनिमित्त संपूर्ण बेनकनहळ्ळी गाव सजवण्यात आले असून सर्वत्र भक्तिमय वातावरण पसरलेले पहावयास मिळत आहे.

सदर श्री महालक्ष्मी यात्रेसंदर्भात बोलताना यात्रा कमिटीचे प्रमुख म्हणाले की, 36 वर्षानंतर ही यात्रा भरत आहे. आज वर्षभरापूर्वी आमच्या गावच्या पंच कमिटीची बैठक होऊन श्री महालक्ष्मी देवी यात्रा भरविण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.Benkanhalli

त्यानुसार आज मंगळवारी 23 एप्रिल 2024 रोजी देवीची यात्रा भरत असून आज सकाळी 7:01 वाजता अक्षता रोपण कार्यक्रम झाला. त्यानंतर विधिवत पूजा झाली असून आता पाटील व देसुरकर घराण्याकडून आलेला पोळीचा नैवेद्य देवीला दाखवण्यात आला आहे. नैवेद्य दाखवण्याच्या कार्यक्रमानंतर श्री महालक्ष्मी रथात आरुढ होणार आहे. रथ मारुती गल्लीत फिरवल्यानंतर दुपारी देवीची मूर्ती सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये हलवून तिचे गणेशपुरला प्रस्थान होईल.

गणेशपुर येथे आयोध्यानगर पासून जुन्या गल्लीत रथ जाऊन चव्हाण हॉस्पिटलकडून रामघाट रोड मार्गे ज्योतीनगरच्या जुन्या गल्लीमध्ये येईल. समस्त भाविकांना दर्शन दिल्यानंतर सूर्यास्तापूर्वी श्री महालक्ष्मी देवी बेनकनहळ्ळी वेशीमध्ये येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी रात्रभर देवी रथातच राहणार आहे. उद्या बुधवारी सकाळी 8 वाजल्यापासून पुन्हा रथ ओढण्यास सुरुवात होईल. त्यानंतर रामघाट रोड, सुभाष गल्ली, मारुती गल्ली मार्गे श्री महालक्ष्मी देवी गावातील मराठी शाळेच्या पटांगणामधील गदगेवर बसणार आहे.

समस्त भाविकांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी, वाहनांकरिता पार्किंग वगैरे आवश्यक सर्व सोयी सुविधांची व्यवस्था करण्यात आली असल्याचे सांगून पार्किंग व्यवस्थितची त्यांनी माहिती दिली. तसेच यात्रा कमिटी, पंच कमिटी आणि समस्त बेनकनहळ्ळी ग्रामस्थांच्यावतीने आवाहन आहे की सरस्वतीनगर, ज्योतीनगर, रामतीर्थनगर, महालक्ष्मीनगर, गंगानगर, आश्रयनगर वगैरे सर्व ठिकाणच्या नागरिकांनी देवीच्या दर्शनाचा लाभ घेऊन यात्रा यशस्वी करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन यात्रा कमिटीच्या प्रमुखांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.