Thursday, December 26, 2024

/

शहरात 11 मे रोजी चित्ररथ मिरवणूक पदाधिकार्‍यांच्या बैठकीत निर्णय :

 belgaum

बेळगाव लाईव्ह :लोकसभा निवडणुकीसाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे. मतदान झाल्यानंतर 9 मे रोजी शहरात पारपंरिक शिवजयंती दिमाखात साजरी करण्यात येणार आहे. शनिवार दि. 11 मे रोजी चित्ररथ मिरवणूक काढली जाणार आहे. मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ बेळगाव यांच्यावतीने रविवारी जत्तीमठ येथे आयोजित बैठकीत शिवजयंती उत्सवावर विचारविनियम करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रकाश मरगाळे होते.

स्वागत आणि प्रास्ताविक कार्यवाह मदन बामणे यांनी केले. गतवर्षीचा अहवाल वाचन शिवराज पाटील यांनी केले. अनुमोदन जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी यांनी केले. यावेळी प्रकाश मरगाळे म्हणाले, बेळगावच्या शिवजयंती उत्सवाला यंदा 105 वर्षे पूर्ण होत आहेत. याशिवाय छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे यंदा 350 वे वर्ष असून शहरात पारंपरिक शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करुया.

1974 मध्ये शिवराज्याभिषेकाला 300 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शहरात संस्मरणीय अशी मिरवणूक काढण्यात आली होती. यंदाच्या मिरवणुकीलाही असाच भव्यपणा असेल, असे सांगितले.

रणजीत चव्हाण -पाटील यांनी बोलताना शिवजयंती उत्सव मंडळांनी आतापासूनच शिवजयंतीची तयारी करावी. पावसाचा अंदाज पाहून गड चढणे- उतरणे स्पर्धा जाहीर केली जाईल, असे सांगितले. यावेळी विजय पाटील, महादेव पाटील, रणजित हावळाणाचे, विनोद आंबेवाडीकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यकर्त्यांनी काही सूचना मांडल्या. त्यावर चर्चा करण्यात आली.

गुरुवार दि.9 मे रोजी सकाळी 7 वा. शिवज्योतींचे स्वागत धर्मवीर संभाजी चौक करण्यात येईल. सकाळी 9 वा. नरगुंदकर भावे चौकातील मंडपात शिवरायांच्या पुतळ्याचे विधिवत पूजन व आरती होणार आहे. सकाळी 10 वा. शहापूर शिवाजी उद्यानातील शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन पूजन करण्यात येणार आहे. शनिवार दि.11 मे रोजी सायंकाळी 6 वा. श्रींच्या पालखीचे पूजन करुन, नरगुंदकर भावे चौकातून शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे.

बैठकीला रमाकांत कोंडुसकर, रणजित चव्हाण पाटील,विजय पाटील, मदन बामणे, महादेव पाटील, विकास कलघटगी, सागर पाटील, शिवराज पाटील, राजू मरवे, विजय पाटील, गणेश दड्डीकर, बाबू कोले , सागर पाटील ,रणजित हावळानाचे, किरण मोदगेकर , अंकूश केसरकर, श्रीकांत कदम आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.