Sunday, January 12, 2025

/

समितीच्या दणकट आवाजाला बळकटी देणे ही आता सीमावासियांची जबाबदारी

 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष :लोकसभा निवडणुकीत एक नवा अध्याय लिहीण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती सज्ज झाली आहे, असेच सध्या म्हणावे लागेल. मराठी वर अन्याय करणाऱ्या कर्नाटकी सरकारच्या ध्येयधोरणांना मूठ माती द्यायची असेल तर मराठीची ताकद एकवटलेली असणे गरजेचे आहे. ही ताकद विधानसभेच्या निवडणुकीत दाखवताना काही प्रमाणात अपयश आले, मात्र संधी आहे ती लोकसभेत संपूर्ण सीमा भागातील मराठी ताकद दाखवण्याची. आलेली संधी न दवडता सीमावासियांचा दणकट आवाज कणखर करण्याची वेळ आली असून ही जबाबदारी समस्त सीमावासियांना हाती घ्यावीच लागणार आहे.

माजी खासदार दिवंगत सुरेश आंगडी यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत सर्वप्रथम बेळगाव लाईव्ह सारख्या माध्यमांनी सीमाभागात लोकसभेला सीमावासियांचा उमेदवार हवाच, ही बाजू लावून धरली आणि उचलूनही. त्यावेळच्या उमेदवाराने मतदानाचा जो टप्पा गाठला त्यामध्ये डिजिटल मीडियाचे योगदान सर्वात मोठे आहे. प्रिंट मीडियाने मदत केली नाही असे नाही मात्र जास्तीत जास्त ताकद लागली ती डिजिटल मीडियाची आणि या मीडियाने जे होणार नाही-होणार नाही असे सांगितले जात होते ते घडवून दाखवले. यावेळीही समिती नेत्यांच्या मनात लोकसभेला उमेदवार द्यायचा असे काही पूर्णपणे मनापासून नव्हतेच. तरीही युवा कार्यकर्ते, मराठीचे भान बाळगणारे नेते आणि डिजिटल माध्यमांवर स्वार सारेच यशस्वी झाले असून लोकसभेला बेळगावसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार म्हणून महादेवराव पाटील यांची निवड आश्वासक चित्र निर्माण करून देणारी अशीच आहे.

कोण आहेत हे महादेवराव पाटील? महादेव पाटील म्हणजे सीमाभागातला सच्चा कार्यकर्ता. अनेक आंदोलनात अंगावर लाठ्या काठ्या झेलून आपला कणखर आवाज सीमावासियांच्या आंदोलनाला बळकटी देण्यासाठी वापरणाऱ्या या कार्यकर्त्याने आजवर घडलेल्या अनेक आमदारांसाठी प्रचाराच्या फेऱ्या गाजवल्या आहेत. काळा दिन असो, हुतात्मा दिन असो किंवा आणखी कोणतेही आंदोलन असो माईकची गरज नाही. सतत कडाडणारे व्यक्तित्व आजवर सीमावासियांची डरकाळी बनून राहिले आहे. बैठक सभा मोर्चाच्या अग्रभागी सर्वप्रथम कडाडणारा आवाज म्हणून महादेवराव पाटील यांचे नाव ओळखले जाते. या महादेव पाटील यांनी अर्ज केला होता. बरोबरीने अनेक इच्छुक उमेदवार होते. मात्र साऱ्यांच्या संमतीने आणि मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या एकंदर निर्णयानंतर महादेवराव पाटील यांचे नाव बेळगाव लोकसभेसाठी मराठी वासियांचा खासदार म्हणून निवडले गेले आहे.

महादेव पाटील हा पैसेवाला उमेदवार नव्हेच मात्र मनामनात आपल्या आवाजाने ओळख निर्माण केलेल्या, आपल्या कार्याने आणि आपल्या तळमळीने प्रत्येकाच्या दिलात स्वार होणारा असा उमेदवार आहे. असे म्हटले तर कदाचित चुकीचे ठरणार नाही. महादेव पाटील यांचा कणखर आवाज आजवर सीमावासियांच्या प्रत्येक आंदोलनाला बळकटी देत गेलाय. त्यामुळे महादेव पाटलांच्या या उमेदवारीला तितक्याच कणखरपणे बळकटी देण्याची जबाबदारी सीमावासियांची असणार आहे.

सीमावासियांनी आजवर आपली ताकद दाखवून दिली आहे. मात्र वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजेच भाजपच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर तर कधी काँग्रेसच्या सर्वधर्म समभावाच्या आभासावर आपली मते नको त्या ठिकाणी वाया घालवली असेही म्हणता येईल. निवडणुकीच्या काळात मराठीतून प्रचार करणारे, मराठी पत्रक देणारे अनेक राजकीय नेते पुढे निवडणुकीत निवडून आले की मराठीचा कसा दुजाभाव करतात याची उदाहरणे आहेत. त्यामुळेच या वेळेची चालून आलेली संधी पाहता बेळगाव लोकसभा मतदारसंघात मराठी भाषिक, महाराष्ट्र एकीकरण समितीचा आणि सर्व सीमावासियांच्या गळ्यातला ताईत असणारा महादेवराव पाटील हा उमेदवार निवडून येईल यात तीळमात्र शंका नाही. मात्र यासाठी एकच करावे लागेल, बेळगाव लोकसभा मतदारसंघात असणारी साडेचार ते पाच लाखाची जी मतसंख्या आहे ती सारी मते महादेवराव पाटील यांच्याकडे चुंबकाप्रमाणे खेचली जाण्याची गरज आहे. हा चुंबक म्हणजेच सीमावासियांवर दररोज होणारे अन्याय अत्याचार आणि इतर साऱ्या गोष्टींना लाथाडणारा चुंबक असायला हवा. या चुंबकाने जमली जाणारी मते म्हणजेच महादेवराव पाटील यांचे खासदार होणे, म्हणजेच सीमाभागातल्या प्रत्येक सर्वसामान्य माणसाचे खासदार होणे असे चित्र सीमा भागात निर्माण होण्याची गरज सध्या निर्माण झाली आहे.

लोकसभेच्या निमित्ताने राष्ट्रीय पक्षांनी आपापला उमेदवार जाहीर केला. भाजपने स्थानिक मराठी भाषिकांना डावलून दुसऱ्या जिल्ह्यातला माजी मुख्यमंत्री आयात केला. मराठीचा दूश्वास करणाऱ्या माणसाला या ठिकाणी निर्णायक मराठी मतांच्या तोंडावर आणून बसवले. मात्र यावेळी मराठी माणसांनी संबंधित पक्षाच्या दिल्लीत बसून गल्लीतले निर्णय चुकीच्या पद्धतीने घेणाऱ्या नेत्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे. आपकी बार 400 पार म्हणता म्हणता प्रत्येक ठिकाणी नापास उमेदवारांना लादण्याची कृत्य करणाऱ्या आणि हिंदुत्वांच्या मुद्द्यावर डोके फिरवणाऱ्या नेत्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची असेल तर आता संबंधित पक्षातील मराठी माणसांनीही मराठी उमेदवाराला मतदान करावे लागेल आणि त्यांना महादेवराव पाटील हे एकमेव उत्तर आहे.

निवडणुकीतल्या स्पर्धेतील दुसरा पक्ष म्हणजे काँग्रेस. त्या पक्षातही अनेक मराठी भाषिक उमेदवार होते. बेळगाव लोकसभा क्षेत्रात निवडून यायचे असेल तर मराठी माणसांकडे मतांचा जोगवा मागावा लागतो. हे निर्णायक सत्य माहित असले तरी काँग्रेसच्या नेत्यांनी पुन्हा एकदा कन्नड भाषिक आणि तोही एका मंत्रिपदावर असलेल्या व्यक्तीच्या मुलाला उमेदवारी देऊन मराठी माणसांचा अपमानच केलाय आणि हा झालेला अपमान सहन करत बसणार की मराठीची ताकद दाखवणार हे आता मराठी माणसाला ठरवावे लागेल.Mahadev patil

तिसरा मुद्दा आहे तो मराठीच्या फलकांचा आणि मराठी म्हणून होणाऱ्या अन्यायाचा. निवडणूक आली की मराठी चालते आणि इतर वेळी मात्र बेळगावच्या मराठमोळ्या वातावरणातील व्यापार आणि उद्योगावर कन्नडची सक्ती केली जाते. बेळगावचा व्यापार उद्दीम गोवा आणि महाराष्ट्राच्या काही भागावर अवलंबून आहे हे माहीत असतानाही बसच्या फलकाप्रमाणे आता दुकानांचे फलक ही कानडी करावे लागत आहेत. कन्नड सक्तीचे फेज टू सुरू आहे. अशा साऱ्या परिस्थितीत लोकसभेत सीमावासियांचा आवाज उठवायचा असेल तर बेळगाव लोकसभा मतदारक्षेत्रात महादेवराव पाटील निवडून येणे ही काळाची गरज बनली आहे आणि ते निवडून येतील असे वातावरण राष्ट्रीय पक्षांनी सुद्धा निर्माण करून दिले आहे.

आता मराठी म्हणून, मराठी भाषिक म्हणून, मराठी अस्मितेचा एक घटक म्हणून साऱ्यांनी एकत्र आल्याशिवाय हे शक्य होणार नाही. हे तितकेच निर्विवाद सत्य आहे. लोकसभेची उमेदवारी मिळणे, लोकसभेची निवडणूक लढवणे, यातच समाधान मानायचे असेल तर काहीच शक्य होणार नाही. लोकसभेत राष्ट्रीय पक्षांची पोळी भाजू इच्छिणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची असेल तर महादेवराव पाटील यांचा कणखर आणि दणकट आवाज मजबूतपणे लोकसभेत पाठवण्याची तयारी मराठी भाषिकांना दाखवावी लागेल. यासाठी जे जे लागेल ते करण्याची तयारी सर्व मराठी भाषिकांनी आता करावी लागेल.

लोकसभा निवडणूक ही पैशांची निवडणूक आहे. कोटीच्या कोटी उड्डाणे केली जाणार आहेत. एका पक्षाच्या स्पर्धेत दुसरा पक्ष आपण जमा केलेली भ्रष्टाचाराच्या रूपातली माया जनतेवर उधळण्याचे नाटक करेल. मात्र नेहमीप्रमाणे हे लक्षात ठेवावे लागेल…. कुणाचेही म्हणजेच सगळ्यांचेच खावा मटण मात्र महाराष्ट्र एकीकरण समितीचेच दाबा बटण……

-प्रसाद सू प्रभू(जेष्ठ पत्रकार बेळगाव)

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.