बेळगाव लाईव्ह :राज्यात उष्म्याची लाट तीव्र होत असल्यामुळे सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत उष्मा तीव्र राहणार आहे. तेंव्हा या कालावधीत जनतेने शक्यतो घराबाहेर पडू नये, अशी सूचना करण्याबरोबरच उन्हात जास्त वेळ राहिल्यास उष्माघात होण्याचा धोका असल्याचा इशारा आरोग्य खात्याने दिला आहे.
बेळगाव जिल्ह्यातील कमाल तापमान 38 सेल्सिअसच्या पुढे गेले असल्याने सकाळी 11 नंतर उष्म्याची तीव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे आरोग्य खात्याने जनतेला आरोग्य सांभाळण्याची सूचना केली आहे.
ऊन तीव्र असल्यामुळे जनतेने दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत घराबाहेर पडू नये. घराबाहेर जायचे असल्यास गॉगल, छत्री, टोपी वापरावी. प्रवासात पाणी सोबत ठेवावे. तहान लागली नसली तरीही पुरेसे पाणी प्यावे. पार्क केलेल्या वाहनांमध्ये मुलांना सोडून जाऊ नये. अशक्तपणा किंवा आजारी वाटत असल्यास डॉक्टरांना भेटावे.
एखादा कार्यक्रम असल्यास आयोजकांनी लोकांची गर्दी जमवताना त्यांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी शामियाना पेंडल उभारावा. त्या ठिकाणी खेळती हवा राहील आणि पाण्याची सोय असेल याची दक्षता घ्यावी.
वाढता उष्मा लक्षात घेऊन अल्कोहोल चहा कॉफी आणि कार्बोनेटेड शीतपेय टाळावीत, उच्च प्रथिने युक्त अन्न टाळावे. शिळे अन्न खाऊ नये ओआरएस, लस्सी, तोरणी (तांदूळ पाणी), लिंबू पाणी, ताक अशा पेयांचा वापर करावा वगैरे आवश्यक सूचना आरोग्य खात्याकडून करण्यात आल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या राज्यात सर्वत्र निवडणुकीचा फिव्हर असल्यामुळे सकाळपासून प्रचाराचा धुरळा उडत आहे. राजकीय पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी भरदुपारी घरोघरी जाऊन प्रचार केला जात आहे. मात्र आरोग्य खात्याने दुपारी 12 ते 4 यावेळेत उन्हात फिरणे टाळावे, अशी सूचना केली आहे.