बेळगाव लाईव्ह विशेष:बेळगाव मतदार संघात मागील लोकसभा पोट निवडणुकीत भाजपच्या खासदार मंगला आंगडी यांना पाच हजार पेक्षा कमी मताधिक्याने निसटता विजय मिळवता आला होता त्यावेळी देखील गोकाक विधानसभा मतदारसंघात भाजपला मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून हे दोन्ही मतदारसंघ भाजपचे बालेकिल्ले मानले जात आहेत. यंदाच्या निवडणुकीत देखील भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांना या दोन्ही मतदारसंघांवर अधिक भिस्त असणार आहे. वरील दोन्ही मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत ते देखील जारकीहोळी कुटुंबातील आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा या मतदारसंघातून वाढल्या आहेत.
बेळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवारीबद्दल अंतर्गत आणि बाहेरील विरोधाला तोंड देत असलेले जगदीश शेट्टर यांना आता अरभावीचे आमदार भालचंद्र जारकीहोळी आणि गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांच्या उघड समर्थनाने प्रोत्साहन मिळाले आहे.
जारकीहोळी बंधुंच्या पाठिंब्यानंतर स्थानिक नेते शेट्टर यांच्या मागे धावून लागले असून महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केलेल्या आरोपांचे खंडन करू लागले आहेत. जारकीहोळी बंधू शेट्टर यांच्या पाठीशी थांबल्यामुळे निवडणुकीची स्पर्धा तीव्र झाली आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या एका गटाने राबविलेली ‘गो बॅक शेट्टर’ मोहीम आणि मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडून होणारे सातत्याने हल्ले यामुळे निवडणूक रिंगणात शेट्टर यांना पीछेहाटीला तोंड द्यावे लागत होते.
शेट्टर आणि भाजप हे हेब्बाळकर यांच्या ‘बाहेरील’ या पत्त्याला प्रतिकार करण्यासाठी धडपडत आहेत. शेट्टर यांनी पंचमसालींच्या 2 -अ आरक्षणाला विरोध केला होता असाही आरोप त्या करत आहेत. तथापी आता जाकीहोळी बंधूंच्या प्रवेशामुळे भाजपच्या बाजूने परिस्थिती हळूहळू बदलत आहे. उमेदवार शेट्टर आणि रमेश जारकीहोळी यांनी संयुक्तरीत्या काल मंगळवारी रामदुर्ग तालुक्यातील गोडची वीरभद्रेश्वर मंदिराला भेट देऊन प्रचाराला प्रारंभ केला.
जारकीहोळी बंधूंच्या खुल्या पाठिंबामुळे पक्ष कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावले आहे. परिणामी शेट्टर यांच्या नामांकनाला गांभीर्याने न घेणारे पक्षाचे नेते आणि पदाधिकारी आता हेब्बाळकर यांच्या आरोपांचे खंडन करून शेट्टर यांचा बचाव करू लागले आहेत. हेब्बाळकर यांनी केलेल्या ‘बाहेरील’ या आरोपाला प्रत्युत्तर देताना शेट्टर यांनी आपण जिल्हा पालकमंत्री आणि मुख्यमंत्री असताना बेळगावसाठी बरेच कार्य केले असल्याचे सांगितले आहे. तसेच एकदा का निवडून आलो की आपण बेळगावातच घर बांधून राहणार आहोत असेही स्पष्ट केले आहे. मात्र त्यानंतर देखील हेब्बाळकर यांनी त्यांना त्यांचा बेळगावचा पत्ता विचारला. तेंव्हा आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी खासदार मंगला अंगडी यांचे घर म्हणजेच शेट्टर यांचा पत्ता असल्याचे सांगितले.
तसेच एकदा का शेट्टर निवडून आले की त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची संधी आहे. केंद्रात पुन्हा भाजप सत्तेवर येणार हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे कोणीही विरोधी पक्षाला मत देऊ इच्छित नाही. एकदा का ते मंत्री झाले की लोकांना त्यांचा पत्ता कळेल. त्यावेळी त्यांना आपला पत्ता सांगण्याची गरज भासणार नाही, असे प्रत्युत्तरही भालचंद्र यांनी दिले. भाजप बेळगाव ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष धनंजय जाधव यांनी देखील हेब्बाळकर यांना प्रत्युत्तर देताना शेट्टर यांना त्यांचा पत्ता विचारण्याआधी मंत्री हेब्बाळकर यांनी प्रथम स्वतःचे मूळ गाव आणि मतदारसंघाबद्दल स्पष्टीकरण द्यावे. त्यादेखील परगावच्या बाहेरील असून बेळगावात स्थायिक झाल्या आहेत. जगदीश शेट्टर देखील तसेच करणार आहेत, असे सांगितले.
राहता राहिले पंचमसाली प्रकरण तर त्यासंबंधी शेट्टर यांनी गेल्या सोमवारी स्पष्टीकरण देताना पंचमसालींच्या 2-अ आरक्षणाला मी कधीच विरोध केला नाही. पंचमसाली समुदायाच्या आरक्षणाला मी नेहमीच पाठिंबा दिला आहे, असे स्पष्ट केले आहे.