बेळगाव लाईव्ह : ‘बाहेरचा उमेदवार’ अशी पाटी घेऊनच बेळगावच्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात भाजपच्या झेंड्याखाली उतरलेले माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी अखेर आपला बेळगाव मुक्काम निश्चित केला आहे.
आज गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर विरोधी पक्षाच्या मतदार संघातच त्यांनी गृहप्रवेश करत विरोधकांना कृतीतून प्रत्त्युत्तर दिले, अशी चर्चा आज बेळगावच्या राजकीय वर्तुळात रंगलेली दिसून आली.
जगदीश शेट्टर यांची उमेदवारी भाजपने जाहीर केल्यानंतर गृहपक्षासह विरोधी पक्षानेही त्यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. जगदीश शेट्टर हे बेळगावचे नसल्याने त्यांचा पत्ता कुठे शोधायचा असा टोलाही लगावला होता. मात्र विरोधकांनी केलेल्या टीकेला जगदीश शेट्टर यांनी प्रत्त्युत्तर देत आज कुमारस्वामी लेआऊट येथे घर घेत वास्तुशांती पार पाडली.
विरोधकांनी टीका केली म्हणून मी बेळगावमध्ये घर घेतले नसून विरोधकांच्या टीकेपूर्वीच बेळगावमध्ये येणार असल्याचे मी सांगितले होते, घर पूर्ण झाले आता लवकरच कार्यालयाचेही उद्घाटन करणार असल्याचे जगदीश शेट्टर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
बेळगावमधील जनतेकडून मला माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त पाठिंबा मिळत असून इतक्या पाठिंब्याची मी अपेक्षा केली नव्हती, असे जगदीश शेट्टर यांनी सांगितले.