बेळगाव लाईव्ह : मराठी संस्कृती आणि महाराष्ट्राची परंपरा लाभलेला खेळ म्हणजे कुस्ती. जगाच्या पाठीवर कुठेही कुस्ती आखाडा आयोजिला गेला तर तिथे सर्वप्रथम महाराष्ट्र आणि छत्रपती शिवरायांचा जयघोष प्रत्येक मल्ल करतोच. परंतु बेळगाव मधील आनंदवाडी येथे जिल्हा कुस्तीगीर संघटनेच्यावतीने आयोजिण्यात आलेल्या कुस्ती आखाड्यात खुद्द मराठी माणसाकडूनच महाराष्ट्र, मराठी आणि कुस्तीचा अवमान झाल्याची घटना बुधवारी घडली. पै. देवा थापा यांनी केलेल्या महाराष्ट्र आणि शिवराय यांच्या जयघोषानंतर उद्योजक श्रीकांत देसाई ज्यापद्धतीने व्यक्त झाले, त्यांच्या त्या भूमिकेचा संपूर्ण सीमाभागासह महाराष्ट्रातही निषेध होत आहे.
श्रीकांत देसाई यांच्या ‘त्या’ विधानावर म. ए. समिती युवा नेते आर. एम. चौगुले यांनी प्रतिक्रिया देताना सर्वप्रथम त्यांचा निषेध व्यक्त केला. हजारो कुस्तीशौकिनांच्या उपस्थितीत सुरु असलेल्या कुस्ती स्पर्धेवेळी आपण ज्या मातीतून आलो, ज्या मातीचा खेळ आपण खेळतो त्या मातीशी इमान राखत पै. देवा थापा या मल्लाने उस्त्फुर्तपणे शिवाजी महाराजांचा आणि महाराष्ट्राचा जयजयकार करणाऱ्या घोषणा दिल्या. कुस्तीची परंपरा ज्या महाराष्ट्राने अबाधित राखली त्याचा जयजयकार करण्यात वावगं काहीच नव्हतं. शिवाय बेळगाव हे महाराष्ट्राचेच आहे हि वस्तुस्थिती देखील प्रत्येकाला माहीत आहे. याच अनुषंगातून देवा थापा यांनी घोषणा दिल्या. क्रीडा क्षेत्रात जात, धर्म, भाषा या गोष्टी गौण माणल्या जातात. तिथे फक्त स्पर्धात्मक खिलाडू वृत्ती असावी लागते. त्यामुळे आम्ही पदाधिकाऱ्यांनी श्रीकांत देसाई यांना त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल जाब विचारला. दुर्दैवाने त्यांच्याकडून समाधानकारक स्पष्टीकरण मिळू शकले नाही. कुस्तीशौकिनांच्या उपस्थितीत या प्रकारानंतर तातडीने आम्ही सर्वांनी श्रीकांत देसाई यांना जाब विचारला, हीच त्यांच्यासाठी चपराक असल्याचे मत आर. एम. चौगुले यांनी व्यक्त केले.
छत्रपती शिवाजी महाराज चालतात मग महाराष्ट्राबाबत एलर्जी का? या प्रश्नाला उत्तर देताना समितीचे युवा आघाडीचे कार्यकर्ते सागर पाटील म्हणाले की, बेळगावसह सीमाभागात आपला पारंपारिक कुस्ती खेळ टिकला पाहिजे. आजच्या आधुनिक युवा पिढीमध्ये या मर्दानी खेळाची आवड निर्माण झाली पाहिजे. यासाठी आम्ही महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आणि कार्यकर्ते कायम कुस्तीपटूंना प्रोत्साहन देत असतो. हे सर्व करत असताना जेंव्हा आंतरराष्ट्रीय दर्जाचे मातीतील जंगी कुस्ती मैदान भरवले जाते आणि त्या ठिकाणी पैलवान देवा थापा सारखा परप्रांतीय लोकप्रिय मल्ल आखाड्यात उतरून मल्ल युद्धाचे संवर्धन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्र राज्याचा जयजयकार करतो यामध्ये गैर अथवा आक्षेप घेण्यासारखे काहींच नव्हते. कालच्या कुस्ती मैदानात कोणतेही राजकारण अथवा कन्नड -मराठी वगैरे कोणता भाषिक वादच नव्हता. कुस्ती मैदानात निखळ खेळाडू वृत्ती होती. मात्र स्वतः मराठी भाषिक असून देखील श्रीकांत देसाई यांनी पैलवान देवा थापा याने केलेल्या जयजयकारावर आक्षेप घेतला. मराठी भाषिक असूनही लाजिरवाणे वक्तव्य केले. ही त्यांची कृती अत्यंत चुकीची निषेधार्ह असल्याचे मत सागर पाटील यांनी व्यक्त केले.
युवा नेते गणेश दड्डीकर म्हणाले की, पाठीत खंजीर खुपसण्याचा इतिहास आजवर आपण ऐकत आलो आहोत. याच इतिहासाची पुनरावृत्ती श्रीकांत देसाई यांनी केली. आपल्याच मातीशी, संस्कृतीशी बेईमानी करत आपल्याच माणसांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम श्रीकांत देसाई यांनी कुस्ती आखाड्यात केल्याचे दड्डीकर म्हणाले.
श्रीकांत देसाई हेदेखील मराठी भाषिक आहेत. परंतु आपल्या मातृभाषेशी प्रतारणा करण्याची त्यांची वृत्ती हि मराठी विरोधी असल्याचे काल स्पष्ट झाले. ज्या महाराष्ट्रात त्यांनी आपला उद्योग विस्तारला आहे, निदान या गोष्टीचे भान त्यांनी बाळगणे गरजेचे होते, असे परखड मत म. ए. समिती नेते, मराठी भाषिक कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.