बेळगाव लाईव्ह:पोलीस दलातील महिला कर्मचारी व अधिकाऱ्यांची शारीरिक तथा मानसिक ताकद वाढविण्यासाठी कर्नाटक राज्य पोलिस दलातर्फे आयोजित ‘भ्रामरी’ हे परिवर्तनवादी शिबिर नुकतेच उत्साहात पार पडले.
बेळगाव येथील जिल्हा पोलीस मुख्यालयात काल गुरुवारी आयोजित या शिबिरामध्ये उत्तर परिक्षेत्र आणि बेळगाव शहरातील 214 महिला पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांचा सहभाग होता.
दैनंदिन आव्हानांना तोंड देण्यासाठी महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची लवचिकता वाढवणे, मानसिक तणाव कमी करणे आणि ऊर्जा पातळी वाढवण्यावर या उपक्रमाचा भर होता. हे शिबिर यूएफ अकादमी फाऊंडेशन आणि बजाज कॅपिटल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सीएसआरद्वारे घेण्यात आले.
शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना प्रमुख पाहुणे बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक (आयजीपी) व प्रभारी पोलीस आयुक्त विकास कुमार विकास यांनी महिलांच्या शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीवर जोर दिला.
शारीरिक व मानसिक संतुलन राखणे आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. निरोगी आरोग्यासाठी शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती अपरिहार्य बनवते असे सांगून आम्ही पोलीस दलात सकारात्मक बदलासाठी वचनबद्ध आहोत.” असे आयजीपी विकास यांनी स्पष्ट केले. युएफ अकादमी आणि स्टुडिओचे संस्थापक आणि अध्यक्ष रवीश धमिजा यांनी सदर उपक्रमाचा उद्देश स्पष्ट करून भामरी उपक्रमाद्वारे महिलांच्या कल्याणावर भर दिला जात असल्याचे सांगितले.
पोलीस दलातील महिलांसाठी असलेल्या कालच्या ‘भ्रामरी” शिबिरामध्ये गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांच्यासह अन्य पोलिस अधिकारी व अनेक महिला कर्मचारी सहभागी झाले होते. या सर्वांना रवीश धमिजा व त्यांच्या सहकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.