बेळगाव लाईव्ह:पाणी दुर्गंधीयुक्त गढूळ असल्याच्या तक्रारीचे आणि पाणी टंचाईचे निवारण करण्यासाठी सध्या शहरातील खंजर गल्ली कॉर्नर वरील सार्वजनिक विहिरीचा पाणी उपसा करून गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकात समाधान व्यक्त होत आहे.
शहरातील खंजर गल्ली कॉर्नरवर जुनी दगडी बांधकाम असलेली मोठी सार्वजनिक विहीर आहे. गेल्या कित्येक वर्षापासून परिसरातील नागरिक घरगुती वापरासाठी सदर विहिरीतील पाण्याचा वापर करण्याबरोबरच पाणी टंचाईच्या काळात पिण्यासाठीही वापर करतात.
मात्र यंदा पावसाअभावी तसेच आता उन्हाळ्याला प्रारंभ झाल्यामुळे सदर विहिरीतील पाण्याची पातळी खालावली असून पाणी गढूळ होण्याबरोबरच त्याला दुर्गंधी येऊ लागली आहे. याबाबतच्या तसेच पाणी टंचाईच्या तक्रारीची दखल घेत नगरसेवक मुजमिल डोणी यांच्या पुढाकाराने महापालिकेकडून सध्या या विहिरीची स्वच्छता सुरू आहे.
गेल्या पाच दिवसापासून विहिरीतील पाण्याचा उपसा करण्याबरोबरच गाळ काढून मुबलक पाणी उपलब्ध व्हावे यासाठी विहिरीची खोली वाढविण्यात येत आहे.
यासंदर्भात बेळगाव लाईव्हशी बोलताना नगरसेवक मुजम्मिल डोणी म्हणाले की, सदर विहिरीची यापूर्वी 2009 व 2015 मध्ये स्वच्छता करण्यात आली होती. खंजर गल्ली आणि परिसराला सध्या पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. तसेच पातळी खालावून या विहिरीतील पाणी देखील गढूळ दुर्गंधीयुक्त झाले आहे. यासाठी आम्ही या विहिरीची स्वच्छता करत असून गाळ काढून तिची खोली वाढविण्यात येत आहे. स्थानिक जाणकार ज्येष्ठ नागरिकांच्या मते सदर विहिरीची खोली 120 फूट इतकी आहे.
आम्ही आता 80 फुटापर्यंत गेलो आहोत, अजूनही किमान 10 फूट गाळ गाळ काढण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. जर आम्ही आणखी 10 ते 15 फूट खोलपर्यंतचा गाळ काढू शकलो तर शहरामध्ये आणखी किमान 2 तास जादाचा पाणीपुरवठा होऊ शकतो. सदर विहीर स्वच्छतेच्या कामासाठी आमदार असिफ (राजू) सेठ यांचे सहकार्य लाभत आहे, असे त्यांनी सांगितले
विहिरीच्या स्वच्छतेच्या कामामुळे पाणी पुरवठ्यात व्यत्यय येऊन लोकांना त्रास होणार आहे. तेंव्हा खंजर गल्ली, चिराग नगर, चांदु गल्ली, घी गल्ली, जालगार गल्ली वगैरे आसपासच्या ज्या भागात या विहिरीतील पाण्याचा पुरवठा होतो. तेथील नागरिकांनी माझी नम्र विनंती आहे की, पुढील दहा-पंधरा दिवस पाणीपुरवठा अभावी होणारा त्रास सहन करून सहकार्य करावे. कारण विहिरीतील झरे मोकळे झाले की मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. येत्या काळात पाण्याची समस्या आणखी गंभीर होणार आहे. येत्या काळात हिडकल किंवा राकसकोप येथून पुरेसे पाणी मिळणे कठीण होण्याची शक्यता आहे. त्यावेळी नागरिक या विहिरीतील पाण्याचा वापर करू शकतात. तेंव्हा माझ्या या प्रभागासह सदर विहिरीचे पाणी शेजारील ज्या प्रभागांमध्ये पुरवले जाते तेथील नागरिकांना माझी विनंती आहे की त्यांनी थोडे जुळवून घेऊन सहकार्य करावे.
असे आवाहन करत सध्या विहिरीतील पाणी उपसण्याबरोबरच वरवरचा गाळकचरा काढला जात आहे. आता उद्यापासून खोदकाम करून विहिरीत साचलेला गाळ काढला असून हे काम किमान आठ दिवस चालणार आहे. लोकांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी आम्ही हे करत असून नागरिकांनी पुढील 8-15 दिवस आम्हाला सहकार्य करावे, असे नगरसेवक मुजम्मिल डोणी शेवटी म्हणाले.