बेळगाव लाईव्ह :सध्याच्या परिस्थितीत उन्हाळा शिगेला पोहोचल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणचे रहिवासी आपापल्या भागात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईने चिंतेत असताना खानापूर तालुक्यातील इटगी गावातील ग्रामस्थांसाठी मात्र ही चिंता या वर्षापासून कायमस्वरूपी गायब झाली आहे. त्यांनी याबद्दल ‘जवळ तलाव पाणी योजना’ राबवून पिण्याच्या पाण्याच्या समस्येपासून दिलासा मिळवून देणाऱ्या इटगी ग्रामपंचायतीचे आभार मानले आहेत.
गेल्या दोन-तीन वर्षांपासून कमी पाऊस आणि कडक उन्हाळा यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे संबंधित भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई ही एक सामान्य समस्या बनली आहे. इटगी गावातील ग्रामस्थांनाही हीच समस्या भेडसावत होती. त्यामुळे त्या गावातील ग्रा. पं. सदस्यांनी कायमस्वरूपी समस्येचे निराकरण करण्याचा निर्णय घेतला.
या संदर्भात बोलताना, इटागी ग्रा. पं. अध्यक्ष रुद्रप्पा तुरमुरी म्हणाले की, चांगले भविष्य घडवण्यासाठी भूतकाळातील कठीण काळाने आम्हाला धडा शिकवला आहे. त्यामुळे इटगीच्या ग्रामपंचायत सदस्यांनी स्थानिक ग्रामस्थांना पूर्वीप्रमाणे गैरसोयीचा सामना करावा लागू नये. त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, म्हणून मोठ्या कल्पकतेने ‘जवळ तलाव पाणी योजना’ राबविली. गेल्या वर्षी उन्हाळ्यात आणि पूर्वीच्या काळातही ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता.
जलनिर्मल प्रकल्पांतर्गत पाण्याची समस्या सोडवण्यासाठी कांही वर्षांपूर्वी मलप्रभा नदीपासून अवघ्या 1.5 कि. मी. अंतरावर असलेल्या गावापर्यंत पाईपलाईन टाकण्यात आली होती. परंतु काही अपरिहार्य परिस्थितीमुळे हा प्रकल्प अयशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले. इटगी आणि आजूबाजूला तीन तलाव असले तरी ते सर्व उन्हाळ्यात कोरडे पडतात. त्याच अनुषंगाने, विहिरी आणि बोअर-वेल्सच्या पाण्याची पातळी देखील कमालीची घसरल्याने गंभीर गैरसोय होत होती, असे चुरमुरे यांनी सांगितले.
माजी ता. पं. सदस्य व इटगीचे रहिवासी बसवराज सानिकोप म्हणाले की, जल निर्मल प्रकल्पांतर्गत टाकलेल्या पाईपलाईनचा वापर करून नदीतील पाणी गावात पोहोचवण्यासाठी एक योजना आखण्यात आली होती. त्यानुसार ती जुनी खराब झालेली पाईपलाईन दुरुस्त करून मलप्रभा नदीतून इटागीपर्यंत पाणी उपसण्यासाठी 15 अश्वशक्ती (एचपी) क्षमतेचा पाण्याचा पंप बसवण्यात आला. तुरमुरी पुढे म्हणाले की, नदीचे पाणी पंपाने गावातील जावळ तलावात आणले जात असल्याने तो जलाशय बनला आहे. त्याच अनुषंगाने आता तलावाच्या पाण्याची पातळी नियंत्रित करता येईल.
तसेच गावातील कोरड्या विहिरी आणि बोअरवेलचे पुनर्भरणही सुरू होईल. तलावाशेजारी एक जलशुद्धीकरण केंद्र (फिल्टर युनिट) बसविण्यात आले असून जे गावाला पुरवठा होण्यापूर्वी पाण्याचे शुद्धीकरण करते. आम्ही हे सर्व कांही केवळ 5 लाख रुपये खर्चून केले गेले. यामुळे 20,000 हून अधिक लोकसंख्येच्या इटगी गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला आहे, असे ग्रा.पं. अध्यक्ष रुद्रप्पा तुरमुरी यांनी स्पष्ट केले.