बेळगाव लाईव्ह :पत्ता विचारण्याच्या बहाण्याने घरासमोर झाडलोट करणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील 2 तोळ्याहून अधिक वजनाचे दागिने दोघा भामट्यांनी लंपास केल्याची घटना अशोकनगर येथे नुकतीच घडली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.
लुबाडणूक झालेल्या महिलेचे नांव लक्ष्मी बसवराज शिरसंगी (वय 45) असे आहे. सदर महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार अशोकनगर येथे काल शनिवारी सकाळी 6:15 ते 6:30 वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी आपल्या घरासमोर झाडलोट करत होत्या.त्यावेळी मोटार सायकल वरून आलेल्या दोघा भामट्यांपैकी एकाने ‘सर किधर है’ अशी लक्ष्मी यांच्याकडे विचारणा केली.
त्यावेळी पत्ता सापडत नसणारे कोणीतरी असावेत असे समजून लक्ष्मी यांनी त्यांना आपण कोणाबद्दल चौकशी करत आहात? अशी विचारणा केली. मात्र तोपर्यंत भामट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व चेन हिसकावून घेऊन आपल्या सहकाऱ्यासह मोटरसायकल वरून पोबारा केला.
त्यावेळी प्रसंगावधान राखून लक्ष्मी यांनी आरडाओरड करत त्या भामट्यांचा पाठलाग करण्याचाही प्रयत्न केला. मात्र ते सुसाट वेगाने निघून गेले. सदर प्रकार नजीकच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्येमध्ये कैद झाला आहे. भामट्याने लक्ष्मी शिरसंगी यांचे लंपास केलेले सोन्याचे दागिने 2 तोळ्याहून अधिक वजनाचे असल्याचे समजते. पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गापासून शिरसंगी यांचे घर जवळच असल्यामुळे भामट्यांनी महामार्गावरून पलायन केला असावे असा कयास आहे.
माळमारुती पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्या अनुषंगाने माळमारुती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जे. एम कालीमिर्ची यांच्या नेतृत्वाखाली भामट्यांचा शोध घेतला जात आहे.