बेळगाव लाईव्ह:अन्नपूर्णेश्वरीनगर, वडगाव येथील रस्त्याचे विकास काम करताना वाटेत अडथळा ठरणारे विजेचे खांब व झाडे हटविण्यात न आल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. त्याचप्रमाणे गटारी व ड्रेनेजचे सांडपाणी तुंबून या भागातील विहिरी दूषित होण्याची भीती निर्माण झाली आहे.
अन्नपूर्णेश्वरीनगर, वडगाव येथील रस्त्याचे विकास काम अलीकडे कांही दिवसांपासून हाती घेण्यात आले आहे. मात्र रस्ता व्यवस्थित करत असताना शेजारील ड्रेनेज व गटारींकडे दुर्लक्ष केले जात आहे.
त्याचप्रमाणे नवा रस्ता तयार करताना वाटेत अडथळा ठरणारे विजेचे खांब, झाडे हटविण्याऐवजी जशीच्या तशी ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असून रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका वाढला आहे.
कांही ठिकाणी रस्त्याचे काम अर्धवट ठेवण्यात आले आहे. रस्ता जरी व्यवस्थित करण्यात येत असला तरी या ठिकाणच्या गटारी व ड्रेनजची व्यवस्थित जोडणी झालेली नसल्यामुळे सध्या कचरा व सांडपाणी तुंबण्याची समस्या निर्माण झाली आहे.
सांडपाणी मोठ्या प्रमाणात तुंबून जमिनीत झिरपत असल्यामुळे आसपासच्या विहिरीतील पाणी दूषित होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
तरी अन्नपूर्णेश्वरीनगर येथील या समस्यांकडे लोकप्रतिनिधींसह संबंधित अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.